शेतीच्या सातबारा उताऱ्यावर 'सामायिक क्षेत्र' असा उल्लेख आहे. म्हणजे ही मालमत्ता वडिलोपार्जित असते का? ती सगळ्या वारसांना समान वाटली जाईल का?
महसुली दस्तऐवजांमध्ये सातबारा उतारा हा एक महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो. शहरातील व्यक्ती असो की खेड्यातील, तो सुशिक्षित असो की अशिक्षित सात-बारा उतारा बहुतेक सगळ्यांना परिचित असतो. त्याबाबत अनेकांना माहिती असते.
कारण या एकाच उताऱ्यावरून अनेक गोष्टी लक्षात येतात. ती जमीन किती आहे, कुठे आहे, त्याचे क्षेत्र किती आहे, मालक कोण आहे, त्या जमिनीची आजची स्थिती नेमकी काय आहे, याबाबतचा बऱ्यापैकी अंदाज ताज्या सात-बारा उताऱ्यावरून आपल्याला काढता येतो.
बऱ्याचदा सात-बारा उताऱ्याच्या शेवटी 'सामायिक क्षेत्र' असा उल्लेख केलेला असतो. अनेकांना असं वाटतं कीख सात-बारा उताऱ्यावर 'सामायिक क्षेत्र' असे लिहिलेले आहे, म्हणजेच ती जमीन, ती मालमत्ता 'वडिलोपार्जित' आहे. पण ती मालमत्ता वडिलोपार्जित असेलच, असं नाही.
मग 'सामायिक क्षेत्र' म्हणजे काय? तर ज्या जमिनीच्या सात-बारा उताऱ्यावर असा उल्लेख केलेला असेल, त्या जमिनीचे सहहिस्सेदार किंवा भोगवटाधारकांमध्ये त्या जमिनीचं सरस-निरस वाटप अद्याप झालेलं नाही, प्रत्येकाचा हक्क, हिस्सा निश्चित करण्यात आलेला नाही असा त्याचा अर्थ.
उदाहरणार्थ, काही जणांनी एकत्रितपणे एखादी जमीन विकत घेतली, पण खरेदीखतात प्रत्येकाचा हिस्सा नमूद केलेला नसेल तर बऱ्याचदा त्या सात-बारा उताऱ्यावर 'सामायिक क्षेत्र' असा उल्लेख केलेला असतो.
ती जमीन वडिलोपार्जित असेलच, असं नाही. ती स्वकष्टार्जित असू शकते, त्यामुळे ती वारसदारांमध्ये समान वाटली जाईलच, असं नाही.
अधिक वाचा: शेतजमिनीसाठी वारस नोंद कशी केली जाते? सातबाऱ्यावर नाव येण्यास किती दिवस लागतात?