Join us

अधिक फायद्याचे म्हणून प्रचलित असणाऱ्या गांडूळ खताच्या वापरावर पण मर्यादा आहेत का? वाचा काय आहे प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 14:36 IST

Vermi Compost Fertilizer : महाराष्ट्रात गांडूळ खताचा प्रचार व वापर याची सुरुवात १९९० च्या सुमारास झाली. त्या काळातील या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी असे सांगत होती की, रासायनिक खतांचा वापर बंद करा. एकदा हेक्टरी ५ टन गांडूळ खत टाकले की, गांडूळचे पीक पोषण विषयक सर्व कामे करतील.

महाराष्ट्रात गांडूळ खताचा प्रचार व वापर याची सुरुवात १९९० च्या सुमारास झाली. त्या काळातील या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी असे सांगत होती की, रासायनिक खतांचा वापर बंद करा. एकदा हेक्टरी ५ टन गांडूळ खत टाकले की, गांडूळचे पीक पोषण विषयक सर्व कामे करतील.

तुम्हाला बाहेरून इतर कोणतेच खत टाकण्याची गरज पडणार नाही, माझा ऊस कारखान्याला गेल्यानंतर येणारा पैसा हा बहुतांशी विकास संस्थेतून घेतलेल्या पीक कर्जाच्या भरण्यासाठी जात असे, कर्जातील मोठा भाग खत खरेदीचा असे. यातून सुटका मिळविण्यासाठी गांडूळ खत वापराचा मार्ग अवलंबिला.

पहिल्या वर्षी बऱ्यापैकी उत्पादन मिळाले. पुढीलवर्षी उत्पादन पातळी इतकी खाली आली की, संपूर्ण अर्थ व्यवस्थाच कोलमडली. मग असे का झाले, याच्या शोधयात्रेत गांडूळ खताचा सविस्तर अभ्यास झाला.

रासायनिक खते नेहमीच गरजेपेक्षा जास्त टाकली जातात. त्यापैकी काही भाग वापरला न गेल्याने जमिनीत शिल्लक राहतो. तो पुढील पिकाला उपलब्ध होऊ शकतो, म्हणून राखीव साठ्यावर पहिल्या वर्षी पीक बऱ्यापैकी मिळते.

याला भुलून शेतकरी तिकडे आकर्षित होतो. दुसऱ्या वर्षी राखीव साठा संपुष्टात आल्याने उत्पादन एकदम ढासळते. (वरील अनुभव)

गांडूळ खत वापराच्या मर्यादा पाहू

१) गांडूळ खत करण्यासाठी आपण नेहमी वापरतो ते शेणखत कंपोस्टच बऱ्यापैकी कुजले व त्यात उष्णता तयार होणे थांबले की, गांडूळ खताच्या पिंजऱ्यात टाकतात.

त्यात गांडुळे सोडून ६ ते ८ आठवडे वरून झाकून सतत ओलावा टिकवून ठेवला जातो. त्यानंतर त्याचे तपकिरीसारखे बारीक खत तयार झाल्यानंतर ते बाहेर उन्हात ढिगात साठविले जाते.

त्यातील गांडूळे तळात बसतात, ती बाजूला करून गांडूळ खत विक्रीला (वापरण्यास) तयार होते. साधे खत आज १५०० रु. टन दरम्यान मिळते, तर गांडूळ खत ८-१० हजार रुपये टन. गांडूळ खतात आपल्या अंगातून काही अन्नद्रव्ये सोडत नाहीत. मग इतकी दरवाढ का? फक्त दिसण्यास आकर्षक दिसते म्हणून.

२) साध्या खतात एक नत्रासाठी २० कर्बाचे अणु असतात, तर गांडूळ खतात १२. हा कर्ण सूक्ष्मजीवाकडून वापरून संपल्यानंतर ० होतो व अन्नद्रव्ये पिकाला उपलब्ध होतात. २०-० पेक्षा १२-० वाटचाल कमी वेळात होते, म्हणून त्याचे परिणाम जलद दिसतात. शेतकरी इकडे आकर्षित होतो.

३) साध्या खतापेक्षा गांडूळ खतात अन्नद्रव्ये जास्त असतात, असे सांगितले जाते. याला कारण गांडुळाच्या पोटात ते जास्त बारीक दळले जाते. थोड्या काळानंतर साध्या खतातूनही ते मिळू शकतात.

४) गांडूळ खतात वापरली जाणारी गांडुळे जमिनीत वाढू शकत नाहीत. यामुळे जमिनीत गांडूळेच गांडूळे होतात असे काहीही होत नाही.

५) गांडूळे हे कच्चा पालापाचोळा कुजवून त्याचे खतात रूपांतर करतात, गांडूळ खत टाकल्यानंतर त्यांना खाण्यासारखे काहीच शिल्लक राहत नाही. यामुळे जमिनीत गांडूळे वाढत नाहीत.

६) असे खत करण्याचे काम जमिनीत फक्त गांडुळेच करतात का तर नाही. पावसाळ्यात गांडूळे, इतर हंगामात अनेक सूक्ष्मजीव हेच काम करतात. मग फक्त गांडुळाला का महत्त्व द्यावे?

७) गांडूळे जमिनीत सतत फिरून जमीन पोकळ करतात. हे काय गांडूळ खत टाकून गांडूळेच वाढत नसल्याने जमिनीत होत नाही.

८) गांडूळ खत तयार करण्यासाठी लाल गुलाबी आखूड लांबीची गांडूळे लागतात. या प्रजाती फक्त सेंद्रिय पदार्थातच वाढतात. जमिनीत नाही. ती खास विकत आणून वापरावी लागतात.

९) गांडूळाकडून तुलनात्मक मऊ भागापासून खत होऊ शकते. काष्ठमय भागापासून नाही. काष्ठमय भागापासून जास्त चांगले खत होते.

राज्य सरकारनेही हे काम हाती घेतले. गांडूळ खत करण्यासाठी मोठे अनुदान वाटपाची योजना आखली गेली. अनेक शेतकरी आकर्षित झाले. काही काळात शेतकऱ्यांचे सर्व प्रकल्प बंद पडले, काही व्यापाऱ्यांचे आजही सुरू आहेत. आज या विषयावर अपवादात्मकच बोलले जाते.

प्रताप चिपळूणकर कृषितज्ज्ञ, कोल्हापूर.

हेही वाचा : Hirvalichi Khate : हिरवळीचे खते जमिनीत नेमकी कधी आणि कशी गाडली पाहिजेत? वाचा सविस्तर

टॅग्स :खतेसेंद्रिय खतसेंद्रिय शेतीशेतीशेतकरीशेती क्षेत्र