Join us

ऊस तोडल्यानंतर पाचटीचे असे करा व्यवस्थापन; रासायनिक खतांवरील खर्च होईल कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2024 10:58 AM

सध्या ऊसतोडणी हंगाम संपला आहे. उसाचे फड रिकामे झाले की, शेतकरी शक्यतो पाचट पेटवून खोडवा उसाची तयारी करतो. मात्र, हीच पाचट जमिनीत कुजवली तर, जमिनीचे आरोग्य सुधारते.

ऊस उत्पादन वाढविण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे दिवसेंदिवस जमिनीचा पोत खालावत चाललेला आहे. जमिनी नापीक बनत आहेत. त्यावर उपाय म्हणून अनेक शेतकऱ्यांचा उसाची पाचट कुट्टी करण्याकडे कल वाढलेला दिसत आहे.

सध्या ऊसतोडणी हंगाम संपला आहे. उसाचे फड रिकामे झाले की, शेतकरी शक्यतो पाचट पेटवून खोडवा उसाची तयारी करतो. मात्र, हीच पाचट जमिनीत कुजवली तर, जमिनीचे आरोग्य सुधारते. सेंद्रिय कर्ब वाढून उत्पादनातदेखील वाढ होते.

एवढेच नाही तर पाचट कुजवल्याने पर्यावरणाचे संवर्धन होणार आहे. यासाठीच अलीकडे अनेक शेतकऱ्यांनी उसाची पाचट न जाळता कुट्टी केली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारण्यापासून उसाच्या उत्पादनातही वाढ होणार आहे.

शेतजमिनीमध्ये पाला-पाचोळा, कुजवणे, शेणखत किंवा कंपोस्ट खताचा वापर केल्यास जमीन सुपिकता तर वाढणार आहेच शिवाय उत्पादनातही वाढ होत असते पाण्याची बचत अन् तणनियंत्रणही होते. उसाचे पाचटं जाळली तर, जमिनीला उपयुक्त असलेले घटक हे नष्ट होतात. वातावरणदेखील प्रदूषित होते.

याच पाचटीची कुट्टी करून जमिनीत कुजवले तर मात्र, जमिनीचा पोत सुधारतो. पाचटाच्या आच्छादनामुळे उन्हाळ्यात पाण्याचे होणारे बाष्पीभवन रोखले जाते. त्यामुळे पाण्याची बचतही होते. पाचटाच्या आच्छादनामुळे उसात पुन्हा तणही लवकर येत नाही. जमीन सुपिकतेसाठी उपयुक्त गांडूळ जीव जंतूंचे संवर्धन होते.

असा करा पाचटाचा वापर - उसाची तोडणी झाली की, ते जाळून किंवा फेकून न देता ऊस लागवड असलेल्या क्षेत्रावर ते पसरून घ्यावे लागणार आहे.ट्रॅक्टरच्या साह्याने मशीनद्वारे पाचटाची कुट्टी करून घेतल्यानंतर ती कुट्टी कुजवण्यासाठी त्यावर युरिया आणि सुपर फॉस्फेट खत टाकून पाणी द्यावे लागते.छोट्या रोटाव्हेटर फिरवल्याने पाचट हे जमिनीत चांगले मिसळते. पाचटासहीत ऊस पिकाला मातीची भर द्यावी लागणार आहे.

पाचट कुजवण्याचे हे आहेत फायदे- किमान एका हेक्टरात आठ ते दहा टन पाचट मिळते. या पाचटातून ०.५ टक्के नत्र, ०.२ टक्के स्फूरद, १ टक्का पालाश तर ३२ ते ४० टक्के सेंद्रिय कर्ब मिळते.म्हणजेच पाचटातून ४० किलो नत्र, वीस ते ३० स्फुरद आणि ७५ ते १०० किलो पालाश मिळते.सेंद्रिय अर्बाच्या माध्यमातून जमिनीची सुपिकता तर वाढतेच.सेंद्रिय पदार्थ कुजत असल्याने कार्बन डायऑक्साइड वायू बाहेर पडतो व तो पिकांना कर्बग्रहण कार्यात उपयोगी ठरतो.उसाचे पाचट जाळण्यापेक्षा ते शेतामध्ये कुजवणे फायद्याचे ठरत आहे.

अधिक वाचा: सेंद्रिय शेतीकडे वाढतोय कल; ह्या खताच्या उत्पादनातून कमवा बक्कळ पैसा

टॅग्स :ऊसकाढणीसेंद्रिय खतशेतकरीशेतीपीकखतेपर्यावरण