Join us

Wheat Market : गव्हाच्या दरात क्विंटलमागे होतेय भाववाढ ; शेतकऱ्यांना मिळणार दिलासा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 16:31 IST

हिंगोली येथील बाजार समितीच्या मोंढ्यात मागील चार महिन्यात क्विंटलमागे गव्हाचे दर वधारले आहेत. (Wheat Market)

हिंगोली : येथील बाजार समितीच्या मोंढ्यात मागील चार महिन्यात क्विंटलमागे गव्हाचे दर जवळपास चारशे रुपयांनी वधारले आहेत. सध्या मोंढ्यात सरासरी शंभर ते दीडशे क्विंटलची आवक होत असून, येणाऱ्या दिवसात दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात रब्बी हंगामात पेरणीच्या कामांना वेग आला आहे. यंदा प्रकल्प, तलावामध्ये मुबलक जलसाठा असल्याने शेतकऱ्यांची गहू, हरभरा पेरणीची लगबग सुरू आहे.जिल्ह्यातील ९० टक्क्यांपेक्षा अधिक शेतकरी रब्बी आणि खरीप या दोन हंगामातील पिकांवरच विसंबून असतात. खरिपात अन्य पिकांच्या तुलनेत सोयाबीनचा; तर रब्बीमध्ये हरभरा पिकाचा पेरा अधिक राहतो.गेल्यावर्षी गव्हाच्या तुलनेत हरभऱ्याचा पेरा अधिक झाला होता. त्यामुळे गव्हाचे उत्पादन कमी होते. त्यामुळे भाव बऱ्यापैकी राहिला. सध्या पेरणीसाठी गव्हाच्या बियाणांची मागणी वाढल्यामुळे दरात वाढ होत असल्याचे येथील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

खुल्या बाजारातही वाढला गव्हाचा दरकृषी उत्पन्न बाजार समित्यांकडून शेतकऱ्यांच्या उच्च प्रतीच्या गव्हाला २,९०० ते ३,३०० रुपये प्रतिक्चिटलचा दर मिळत आहे. त्यातुलनेत खुल्या बाजारात हलक्या प्रतिचा गहू ३,४०० रुपये; तर उच्च प्रतीचा गहू तब्बल ३,८०० रुपये प्रतिक्विंटलने विक्री होत आहे.

गहू राखून ठेवणारे शेतकरी फायद्यात !जिल्ह्यात गव्हाचे लागवड क्षेत्र हरभऱ्याच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे उत्पन्न फारसे नाही. विशेष म्हणजे ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात लागवड आणि एप्रिल ते मे महिन्यात गव्हाची काढणी प्रक्रिया पूर्ण होते; तर जुलै महिन्यापर्यंत शेतकरी गहू विकून मोकळे होतात. ज्या शेतकऱ्यांनी दरवाढीच्या अपेक्षेने गहू राखून ठेवला होता, ते सध्या गव्हाची दरवाढ झाल्याने फायद्यात आहेत. ज्यांनी गहू विकण्याची घाई केली, त्यांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रगहूबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड