हमीभावाने कापूस विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना काही बाबींची पूर्तता आताच करावी लागणार आहे. कापूस हंगाम २०२५-२६ साठी केंद्र सरकारने हमीभावाने कापूस विक्री करण्यासाठी प्रणाली निश्चित केली आहे.
कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्याकडील कापूस विक्रीसाठी 'कपास किसान' नावाचे मोबाईल ॲप ३० ऑगस्ट २०२५ पासून उपलब्ध केलेले आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी 'कपास किसान' हे ॲप मोबाईलमध्ये डाऊनलोड करून दि. १ ते ३० सप्टेंबरपर्यंत नोंदणी करून घ्यावी.
३० सप्टेंबर ही नोंदणी करण्याची अंतिम मुदत असल्याचे बीड कृषी उत्पन्न बाजार समितीने कळविले आहे. कापूस पिकाची नोंद करण्यासाठी सातबारा उतारा, सातबारा उताऱ्यावर कापूस पिकाची नोंद, आधारकार्ड, शेतकऱ्याचे फोटो आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.
कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी करून घेण्याचे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धनंजय गुंदेकर यांनी केले आहे.