Join us

तेलंगणा, आंध्र प्रदेशातील हळद विक्रीसाठी दाखल झाल्याने बाजारात मंदीचे सावट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 11:14 IST

Halad Market Rate : मार्केट यार्डात तेलंगणा, आंध्र प्रदेशातील हळद विक्रीसाठी दाखल होत असल्याने एका आठवड्यातच पिवळ्या सोन्याचे भाव हजारांनी पडले आहेत.

मागील अनेक दिवस स्थिर असलेल्या हळदीच्या दराने मागील आठवड्यात उच्चांकी घेतली होती. पण, सध्या नांदेड येथील मार्केट यार्डात तेलंगणा, आंध्र प्रदेशातील हळद विक्रीसाठी दाखल होत असल्याने एका आठवड्यातच पिवळ्या सोन्याचे भाव हजारांनी पडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची हळद बाजारात येईपर्यंत हे दर टिकून राहतीलच, असे सांगता येत नाही.

मराठवाड्यात सर्वात मोठी हळदीची बाजारपेठनांदेड व हिंगोली येथे आहे. या दोन्ही जिल्ह्यात सिंचनाची सोय असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी हळदीचे पीक घेण्यास प्राधान्य देतात. नांदेड जिल्ह्यात इसापूर प्रकल्पामुळे तब्बल ९० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र सिंचनाखाली आलेले आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड, नांदेड, हदगाव, हिमायतनगर, भोकर, धर्माबाद या तालुक्यात हळदीची लागवड केली जाते. गेली काही वर्षांपासून हळदीला चांगला दर मिळू लागल्याने गॅरंटेड उत्पादन देणारे पीक म्हणून शेतकरी याकडे वळल्याचे दिसून येते. यावर्षी जिल्ह्यात हळदीचे पीक सर्वत्र बहरले असून उत्पादनही हाती चांगले येईल, अशी आशा आहे.

नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापूस, सोयाबीन या पिकाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यल्प भाव मिळत आहे. शासनाने जाहीर केलेला हमीभावही अनेक ठिकाणी मिळत नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे, असे शेतकरी ऊस, केळीसह हळद पिकांची लागवड करीत आहेत.

नांदेड जिल्ह्यात यंदा अनेक शेतकऱ्यांनी इतर क्षेत्र कमी करून हळदीची लागवड केलेली आहे. तसेच परिसरातील हिंगोली जिल्ह्यातही हळदीचे पीक चांगले असल्याने गतवर्षीपेक्षा चांगले उत्पादन हाती येईल, अशी शक्यता शेतकऱ्यांसह कृषितज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. पण, बाजारात भाव किती मिळेल, हे सांगता येणार नाही.

नांदेड मार्केटमध्ये असे पडले दर

नांदेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात हळदीचे भाव आठ दिवसांतच एक हजार रुपयांनी खाली आले आहेत. येथील बाजारात २२ जानेवारी रोजी प्रतिक्विंटल हळदीचा भाव १४ हजार ५५० ते १३ हजार ६६० रुपये असा होता. तर ३० जानेवारी रोजी झालेल्या लिलावात हळदीला कमाल १३ हजार ४०० तर किमान १२ हजार ८०० रुपयांचा भाव मिळाला आहे. त्यामुळे आठवड्यातच दरात मोठी घसरगुंडी झाल्याचे पाहायला मिळते.

हेही वाचा : अहो ... सरपंच साहेब विसरू नका बरं; 'या' आहेत तुमच्या कामाच्या जबाबदारी

टॅग्स :बाजारपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेतकरीशेतीनांदेडनांदेडतेलंगणा