Join us

Tur Market : शेतकऱ्यांना आता नव्या तुरीतून अनेक आशा वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 16:54 IST

Tur Market :एकीकडे नैसर्गिक संकटांमुळे उत्पादनात घट होत असताना दुसरीकडे पडत्या भावात शेतमाल विक्री करावा लागत आहे. परिणामी, लागवड खर्च ही वसूल होत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.अशातच शेतमाल हाती येत असताना बाजार समित्यांच्या मोंढ्यात शेतमालाच्या दरात घसरण सुरू झाली.

Tur Market : शेतकऱ्याकडे शेतमाल (Agricultural goods) येताच बाजारात दर घसरण्याचा अनुभव नेहमीचाच झाला आहे. यंदा सोयाबीन(Soybean) कवडीमोल दरात विक्री करावे लागत असताना आता नवी तूर(Tur) दाखल होताच दरात घसरण सुरू झाली आहे.

एकीकडे नैसर्गिक संकटांमुळे उत्पादनात घट होत असताना दुसरीकडे पडत्या भावात शेतमाल विक्री करावा लागत आहे. परिणामी, लागवड खर्च ही वसूल होत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

यंदा खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून शेतकरी विविध नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत आहेत. वारंवार बदलत्या वातावरणामुळे पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे फवारणी खर्चात अधिकच वाढ झाली.

अशातच शेतमाल हाती येत असताना बाजार समित्यांच्या मोंढ्यात शेतमालाच्या दरात घसरण सुरू झाली. आधी सोयाबीन आणि आता कापसाच्या दरातही घसरण झाली आहे. अशात शेतकरी एनसीसीएफ, सीसीआयच्या केंद्रांकडे आशेने पाहत होते.

परंतु, बारदाण्याचा प्रश्न, अटी, शर्तीचा भरणा असल्याने शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडे शेतमाल विकण्याशिवाय पर्याय उरला नाही. दरातील घसरणीमुळे पिकावरील खर्चही वसूल होईनासा झाला. अशा परिस्थितीत आता नवी तूर बाजारात दाखल होत असतानाच या शेतमालाचे ही दर घसरण्यास सुरुवात झाली आहे.

बाजार समितींच्या मोंढ्यात तुरीला ६ हजार ८५० ते ७ हजार ३०० रूपये प्रति क्विंटलचा दर मिळत असला तरी सरासरी ७ हजार रुपयांखाली नव्या तुरीची खरेदी होत आहे.

अकरा हजारांची तूर आली सात हजारांवर

मागील वर्षभर तुरीला १० ते ११ हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला. आता यंदाच्या हंगामातील नवीन तूर बाजारात दाखल होण्यास सुरुवात झाली असून, या शेतमालाची आवकही वाढू लागली आहे. बाजारात जसजशी आवक वाढत आहे. तसतसे तुरीचे दर घसरत आहेत. सद्यस्थितीत तुरीला सरासरी ७ हजार ते ७ हजार २०० रुपये प्रतिक्चिटल पर्यंतचा दर मिळत आहे.

शासकीय खरेदीची मागणी...

मोंढ्यात आवकेचा दबाव वाढून दर आणखी कमी होण्याची भीती आहे. त्यामुळे सरकारच्या हमीभाव खरेदीचा शेतकऱ्यांना आधार हवा आहे; पण सोयाबीन प्रमाणे तुरीचे होऊ नये यासाठी तातडीने खरेदी जाहीर करून नोंदणी सुरु करावी, अशी मागणी शेतकरी करत आहे.

शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच...

यावर्षीच्या हंगाम तरी चांगला जाईल या आशेवर खरिपामध्ये सोयाबीन, कापूस, तूरीची पेरणी केली. परंतु, हे पिके हातात येताच शेतमालाचे भाव गडगडले. अतिवृष्टीत सोयाबीनचे बऱ्यापैकी नुकसान झाले. तर कापूस दुसऱ्या वेचणीतच संपला. शासनाच्या खरेदी केंद्रावर कधी लांबच लांब रांगा तर कधी केंद्र बंद राहत असल्याने शेतकऱ्यांच्या नशिबी शेवटी निराशाच आली आहे.

शेतकरी सांगातात........

गेल्यावर्षी दहा हजार रुपये भाव असल्यामुळे यावर्षी तोच भाव राहील, या आशेवर मोठ्या प्रमाणावर खर्चही केला. खत, महागड्या फवारण्या केल्या परंतु, वातावरण बदलामुळे तुरीला फटका बसला. कशीबशी आलेल्या तुरीला भावही सहा हजाराच्या आसपास राहत असल्यामुळे माझा खर्च निघणे अवघड झाले आहे. - धारबा मुळे, शेतकरी

मी यावर्षी नगदी पीक म्हणून मी तुरीला पसंती दिली. तूर चांगल्या प्रमाणात दिसू लागल्यामुळे महागड्या फवारण्या खतावर मोठ्या प्रमाणावर खर्च केला. परंतु, वातावरण बदलामुळे त्याचा परिणाम तुरीला अल्प उत्पादन निघाले आणि त्यातही भाव गडगडल्यामुळे माझा खर्च निघणे मुश्कील आहे.- मुंजाजी वटारे, शेतकरी

हे ही वाचा सविस्तर : Agriculture News : जिनिंगमध्ये मापात पाप; शेतकऱ्यांनी कापूस खरेदी पाडली बंद, काय घडलं नेमकं?

टॅग्स :शेती क्षेत्रतूरबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डहिंगोली