Join us

Tur Harbhara Market: तूर, हरभऱ्याची दरकोंडी कायम; काय आहे कारण जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 11:39 IST

Tur Harbhara Market: तूर आणि हरभऱ्याची आवक बाजारात मागील दिवसांपासून होत आहे. परंतु मार्केट यार्डात शेतमाल येताच दरकाेंडी सुरु झाली त्यामुळे शेतकरी आता भाववाढीच्या प्रतीक्षेत आहेत. (Tur, Harbhara Market)

हिंगोली : मागील वर्षी अकरा हजारांचा पल्ला गाठलेल्या तुरीची यंदा मात्र सरासरी ७ हजार रुपयांवर दरकोंडी कायम आहे. तर हरभऱ्याच्या दरातही वाढ होत नसल्याने शेतकरी भाववाढीच्या प्रतीक्षेत आहेत. (Tur, Harbhara Market)

अतिवृष्टी, किडींचा प्रादुर्भाव यामुळे यंदा तुरीचे उत्पादन निम्म्याखाली आले. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा फवारणीचा खर्च वाढला असताना उत्पादनात घट झाली. 

अशा परिस्थितीत दहा ते बारा हजार रुपये सरासरी भाव मिळेल, अशी आशा होती. मात्र, तुरीने सरासरी ७ हजार ५०० रुपयांचा टप्पा ओलांडला नाही. परिणामी, शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली. (Tur, Harbhara Market)

अनेक शेतकऱ्यांनी आज-उद्या भाववाढ होईल, या आशेपोटी तूर विक्रीविना ठेवली; परंतु दोन महिने प्रतीक्षा करूनही भाववाढ झालेली नाही. (Tur Harbhara Market)

सध्या मोंढ्यात किमान ६ हजार ५०० ते कमाल ७ हजार ३०० रुपये भाव मिळत आहे. तर सरासरी भाव ७ हजार रुपयांवर जात नसल्याचे चित्र आहे. हरभरा उत्पादकांचीही वेगळी परिस्थिती नसून, किमान सहा ते साडेसहा हजार रुपये दराची अपेक्षा असताना सरासरी साडेपाच हजारांच्या पुढे भाव जात नसल्याचे पाहायला मिळत आहे. (Tur Harbhara Market)

हंगामाच्या प्रारंभी काही दिवस हरभऱ्याला ६ हजारांचा भाव मिळाला होता. मागील महिनाभरापासून मात्र भावात घसरण झाली असून, ती अजूनही कायम आहे. सोयाबीन, तूर, हरभऱ्याला यंदा समाधानकारक भाव मिळाला नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. (Tur Harbhara Market)

भाव वाढत नसल्याने आवक मंदावली

* बाजार समितीच्या मोंढ्यात तूर, हरभऱ्याची भाववाढ होत नसल्यामुळे आठवडाभरापासून आवक मंदावल्याचे चित्र आहे.

* सध्या सरासरी ३०० ते ३५० क्विंटल तूर विक्रीसाठी येत आहे. तर हरभऱ्याची आवक जवळपास ३५० क्विंटल होत आहे.

* सोयाबीनच्या दरात मात्र किंचित वाढ झाल्याचे चित्र आहे; परंतु आता सोयाबीन शिल्लक नसल्यामुळे भाववाढीचा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही.

हे ही वाचा सविस्तर : Nafed Harbhara Kharedi: 'या' कारणामुळे शेतकऱ्यांनी हरभरा हमीभाव केंद्राकडे फिरवली पाठ

टॅग्स :शेती क्षेत्रतूरहरभराबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड