Join us

धाराशिवच्या कुसळ्या माळरानावरील द्राक्षे यंदा परदेशात खाणार भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 16:31 IST

महाराष्ट्राची कुलदेवता असलेल्या आई श्री तुळजाभवानी देवीच्या सान्निध्यातील म्हणजेच तुळजापूर तालुक्यातील द्राक्षे (grape export) यंदा थेट परदेशात रवाना होणार आहेत.

अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरणाचा सामना करीत कृष्णेच्या पाण्यावर कुसळ्या माळरानावर उत्पादित केलेली तुळजापूर तालुक्यातील काटी मंडळ कृषी मंडळातील द्राक्षे यंदाही परदेशात रवाना होणार आहेत. यासाठी मंडळातील चारशे द्राक्षे उत्पादकांनी कृषी विभागाकडे अधिकृत नोंदणी केली आहे.

धाराशीव जिल्हयात तुळजापूर तालुक्यातील काटी, सावरगाव हा भाग द्राक्षाचा पट्टा म्हणून ओळखला जातो. काटी कृषी मंडळातील २२ गावांत दोन हजार एकरांवर द्राक्ष उभा आहेत. पावसाअभावी दुष्काळी स्थिती असताना शेतकऱ्यांनी ऑक्टोबरची छाटणी केली, मात्र फळधारणा होण्याच्या वेळीच ढगाळ वातावरण, अवकाळी पावसाचा फटका बसला. या नैसर्गिक संकटाशी दोनहात करीत द्राक्षाचे पीक घेतले.

आता माळरान जमिनीवर पिकविलेली ही द्राक्षे परदेशात निर्यात करण्यासाठी या भागातील सुमारे चारशे शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे अधिकृत नोंदणी केली आहे. त्यामुळे यंदाही हजारो टन द्राक्षे परदेशात निर्यात होऊन चांगला भाव पदरात पडेल, अशी अशा बागायतदारांना आहे. दरम्यान, वर्षानुवर्षे द्राक्ष उत्पादन घेताना एकरी साधारपणे साडेतीन लाख रुपये खर्च येतो. असे असतानाच दुसरीकडे बाजारपेठेत मात्र अपेक्षित दर मिळत नाही. किमान यंदातरी चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे.

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत ॲग्रो चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

हजार टनाची निर्यात वाढणार गतवर्षी काटी कृषी मंडळातून साडेचार हजार टन द्राक्षे विदेशात निर्यात झाली होती. यंदा हा आकडा साडेपाच हजार टनापर्यंत जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.कृषी विभागाकडे निर्यातीसाठी नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली असल्याची माहिती काटीचे मंडळ कृषी अधिकारी आनंद पाटील यांनी दिली.

एक एकर उत्पादन घेण्यासाठी वार्षिक खर्च साधारण साडेतीन लाख रुपयांपर्यंत जातो. या खर्चात दर वर्षाला वाढ होते, पण द्राक्षाला १० वर्षांपूर्वी जो भाव तोच भाव आजही मिळतो आहे. त्यामुळे खर्चाच्या तुलनेत योग्य भाव मिळाला हवा. - निखिल वडणे, द्राक्ष सल्लागार, माळुंब्रा

टॅग्स :द्राक्षेउस्मानाबादशेतकरी