Join us

हा चिंच बाजार राज्यात अव्वल; येथील चिंचांना जगभरातून मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 10:36 AM

अहमदनगरच्या बाजारात जवळपास ७ जिल्ह्यांतील चिंचाची आवक झाली आहे. यंदा उत्पादनात दुपटीने वाढ झाली असून, १५ हजार रुपये क्विंटलपर्यंत चिंचांना भाव मिळत आहे. नगरच्या बाजारातील चिंच गुणवत्तेमुळे फक्त देशभरातच नाही तर जगभरात पोहोचली आहे.

योगेश गुंडकेडगाव : अहमदनगरच्या बाजारात जवळपास ७ जिल्ह्यांतील चिंचाची आवक झाली आहे. यंदा उत्पादनात दुपटीने वाढ झाली असून, १५ हजार रुपये क्विंटलपर्यंत चिंचांना भाव मिळत आहे. नगरच्या बाजारातील चिंच गुणवत्तेमुळे फक्त देशभरातच नाही तर जगभरात पोहोचली आहे. चिंचांमुळे हजारो महिलांना रोजगार मिळाला आहे.

नगर हे राज्यातील चिंचेच्या व्यापाराचे प्रमुख केंद्र आहे. मालाची गुणवत्ता व व्यवहारातील पारदर्शकता यामुळे देशभरातील चिंचेचे व्यापारी नगरच्या बाजारातील चिंच खरेदी करण्यास प्राधान्य देतात. औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड, जालना, सोलापूर, नाशिक, जालना आदी जिल्ह्यांतील चिंचा विक्रीसाठी येथे येतात.

सध्या बाजारात दररोजच्या हजार गोण्यांची आवक सुरू आहे. मार्च महिन्यात ही आवक थेट पाच हजार गोण्यांपर्यंत होती. सध्या चिंचेला ९ हजार रुपये क्विंटल ते १५ हजार रुपये क्विंटल असा भाव मिळत आहे. येथील चिंचा देशभरातील बाजारात विक्रीसाठी जातात.

देशात सर्वात जास्त चिंचांचा व्यापार येथील बाजारात होतो. तसेच, जगभरात भारतातीलच चिंचेला मागणी होत असल्याने नगरच्या चिंचा सातासमुद्रापार पोहोचत आहेत.

चिंचोंक्याचे भाव दुप्पट• मागील वर्षी चिंचोक्याचे भाव १५०० ते १७०० रुपये क्विंटल होते.• यावर्षी त्यात दुपटीने वाढ झाली असून यंदा ३ हजार ते ३ हजार २०० रुपये क्विंटल इतका भाव चिंचोक्यांना मिळाला.• यामुळे मजुरी करणाऱ्यांनाही चांगली मजुरी मिळाली.

फेब्रुवारी महिना सुरू झाला की चिंच खाली उतरावयाला सुरुवात होते. सध्या चिंचाचे उत्पादन जास्त आहे. चिंच गोळा करण्यासाठी ३०० रुपये रोजंदारी मिळते. एक-दीड महिना चिच उतरवल्या जातात. नंतर चिंच फोडण्याचे काम चालू होते. यातून आम्हाला चांगला रोजगार मिळाला. - लताबाई शिंदे, महिला मजूर

येथील चिंचा देशातच नाही तर जगभरात विक्रीसाठी जातात. नगर हे चिंच व्यवसायाचे मोठे केंद्र आहे. सात जिल्ह्यांतील माल नगरला विक्रीसाठी येतो. सध्या ९ हजार ते १५ हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव आहेत. यावर्षी माल व भाव चांगला होता. - योगेश चंगेडिया, चिंच व्यापारी

अधिक वाचा: आयात निर्यात व्यवसाय कसा सुरु करावा? यासाठी काय कागदपत्रे लागतात

टॅग्स :शेतकरीशेतीबाजारमार्केट यार्डकामगार