Join us

Agriculture Market : "मुंबईत होणार जगातील सर्वांत मोठे शेतमाल मार्केट"; पणन मंत्रीपदाची सूत्रे हाती घेताच रावल यांची मोठी घोषणा

By दत्ता लवांडे | Updated: January 9, 2025 21:11 IST

राज्याचे नवे पणनमंत्री हे पुण्यातील महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने आयोजित केलेल्या मिलेट्स महोत्सवाच्या उद्घाटनानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

Pune : "महाराष्ट्रात जवळपास ३०० बाजार समित्या आहेत, पण काही तालुक्यांमध्ये बाजार समित्या नाहीत, या तालुक्यांमध्ये बाजार समित्या का नाहीत याचा अभ्यास करून त्या तालुक्यांमध्ये नव्याने बाजार समिती स्थापन करण्याचा विचार होणार आहे आणि मुंबईमध्ये येणाऱ्या काळात जगातील सर्वांत मोठे शेतमाल मार्केट उभारणार आहोत" अशी घोषणा नवे पणनमंत्री जयकुमार रावल यांनी केली आहे. 

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने पुण्यात आयोजित केलेल्या मिलेट्स महोत्सवाच्या उद्घाटनानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी पणन विभागाच्या कारभाराची दिशा कशी असेल यावर भाष्य केले. राज्यातील शेतकऱ्यांना बाजार समित्या किंवा पणन व्यवस्थेचा कसा लाभ होईल यावर काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, " मुंबईच्या जवळपास कुठेतरी जगातील सर्वांत मोठी बाजार समिती उभारण्याचा आमचा संकल्प आहे. यामध्ये महाराष्ट्रातील आणि भारतातील सर्व शेतकऱ्यांचा माल जगाच्या बाजारात विकला जाईल. फळे, भाजीपाल, प्रक्रियायुक्त शेतमाल आणि शेतीच्या सर्व मालाची मोठी बाजारपेठ या ठिकाणी निर्माण करून शेतमालाचे जागतिक स्तरावरील हब तयार करण्याचा संकल्प केला आहे" असे पणन मंत्री म्हणाले.

"सध्या मी पणन मंडळाचा कारभार जाणून घेतोय, पणन मंडळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कसा फायदा होईल याचाच विचार केला जाईल. कामाची सुरूवात चांगल्या गोष्टीपासून करणार आहोत. चुकीच्या गोष्टी घडत असतील तर नक्कीच त्याची चौकशी होऊन कारवाई केली जाईल पण मी अजून काही गोष्टी जाणून घेतोय, विभागातील गैरव्यवहाराबद्दल मला अजून माहिती नसल्यामुळे मी त्यावर बोलणे योग्य ठरणार नाही" असेही मत गैरव्यवहाराच्या प्रश्नावर बोलताना पणन मंत्र्यांनी व्यक्त केले.

टॅग्स :मार्केट यार्डबाजारमुंबईशेतकरीशेती क्षेत्र