Join us

बाजार समित्यात सोयाबीनचा भाव घटला अन् शेतकऱ्यांनी विकण्याचा विचारच बदलला!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2024 5:31 PM

शेतकऱ्यांकडून गरजेनुसार विक्रीः सोयाबीनचा सरासरी दर चार हजारांखाली

वाशिम : जिल्ह्यातील बाजार समित्यांत ठवडाभरापासून सोयाबीनच्या दरात थोडी घसरण झाली आहे. सद्य:स्थितीत सोयाबीनचा सरासरी दर साडेचार हजारांच्याही खाली आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध पवित्रा घेतला असून, ते सोयाबीनची गरजेनुसार विक्री करीत आहेत. परिणामी बाजार समित्यांत सोयाबीनची आवक कमी होत आहे. गत दोन दिवसांत जिल्ह्यातील मुख्य बाजार समित्यांत एकूण १६ ते १८ हजार क्विंटल सोयाबीनचीच आवक झाल्याचे दिसून आले.

गत हंगामाच्या सुरुवातीलाच सोयाबीनच्या दरात घसरण सुरू झाली होती. गतवर्षी हंगामाच्या अखेर सात हजारांवर असलेला सोयाबीनचा दर नव्या हंगामात थेट पाच हजारांपर्यंत घसरला. सोयाबीनच्या दरातील घसरण नव्या वर्षातही सुरूच राहिली आणि सोयाबीनचा दर थेट ४ हजार २०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत घसरला.

आधीच सोयाबीनच्या उत्पादनात घट आली असताना बाजार समित्यांत सोयाबीनचा दर घसरल्याने शेतकऱ्यांना या पिकावर केलेला खर्चही वसूल होणे कठीण झाले होते. दरम्यान, नाफेडने पुन्हा एकदा सोयाबीनच्या खरेदीस मुदतवाढ दिली. यानंतर बाजार समित्यांत सोयाबीनच्या दरात झपाट्याने वाढ झाली. गत आठवड्यात सोयाबीनचा दर थेट ४ हजार ७२० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत चढला होता.

त्यानंतर मात्र सोयाबीनच्या दरात घसरण झाली आणि आठवडाभरातच सोयाबीनचा दर सरासरी साडेचार हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आला, तर सरासरी दर त्यापेक्षाही खाली आहे. सोयाबीनच्या दरात झालेली घसरण पाहून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी गरजेनुसार विक्री सुरू केल्याने बाजार समित्यांत मागील दोन तीन दिवसांपासुन सोयाबीनची आवक कमी होत आहे.

दरात वाढ होणार?

ब्राझील आणि अर्जेंटिना या मुख्य सोयाबीन उत्पादक देशात यंदा उत्पादन घटले असून, खाद्य तेलाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळेच मागील काही दिवसांपूर्वी सोयाबीनच्या दरात वाढ झाली होती. अद्यापही सोयाबीनला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांतच सोयाबीनच्या दरात वाढ होण्याची शक्यता बाजारतज्ज्ञांनी वर्तविली आहे.

कोठे किती कमाल दर, किती आवक

बाजार समिती & आवक (क्विंटल)  & दर 

वाशिम - ३५०० क्विंटल -४५५०

रिसोड - ३३१० क्विंटल - ४४३०

कारंजा - ४५५० क्विंटल - ४५५० 

मं. पीर - ७०० क्विंटल - ४६५०

मानोरा - ४०० क्विंटल - ४५०० 

खरीप हंगामाचा असेल प्रभाव

जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. यासाठी खते, बियाणे खरेदीची लगबग येत्या काही दिवसांतच सुरू होणार आहे. त्यामुळे बाजार समित्यांत सोयाबीनची आवक कमी होण्याची अधिक शक्यता आहे. अशात सोयाबीनच्या दरावर प्रभाव पडूनही सोयाबीनच्या दरात वाढ होण्याची शक्यता मुळीच नाकारता येत नाही.

हेही वाचा - निंबोळी अर्काच्या वापरामुळे वाचतो २५ टक्क्याहून अधिक कीटकनाशकांचा खर्च

टॅग्स :सोयाबीनशेतीशेतकरीविदर्भबाजार