Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनचा दर दोनशे रुपयांनी उतरला; किती मिळतोय भाव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 11:30 IST

लातूरच्या बाजारात १३,८९३ क्विंटलची आवक

यंदा सोयाबीनच्या दराने शेतकऱ्यांची निराशाच केली असून, रब्बीची पेरणी होऊन काढणीला पिके आले तरी सोयाबीनच्या दरात वाढ झाली नाही. गेल्या पंधरा दिवसांत पुन्हा दोनशे ते अडीचशे रुपयांनी क्विंटलमागे दरात घट झाली आहे. ज्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी आणखीन विक्रीला सोयाबीन नेले नाही, त्यांच्यात नाराजीचा सूर उमटत आहे. सध्या लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये १३,८९३ सोयाबीनची आवक होती, तर सर्वसाधारण दर ४,८५० निघाला. यामुळे यंदा सोयाबीनचा दर वाढणार की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांनापडलेला आहे.

लातूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक सोयाबीनचे क्षेत्र आहे ऊस आणि सोयाबीन ही जिल्ह्यातील प्रमुख पिके आहेत. पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात झाला तर उसाकडे शेतकरी वळतात. पावसाच्या पाण्यावरच पीक काढायचे असेल तर सोयाबीन घेतले जाते. 

पाऊस असा तसाच असला तरी बऱ्यापैकी उत्पन्न झाले आहे; मात्र दर मिळत नाही. प्रत्येक क्चिटल पाच हजार शंभरच्यावर यंदा सोयाबीनचा दर गेलेला नाही. त्यामुळे अनेक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी दर वाढेल या आशेने सोयाबीनचा साठा करून ठेवलेला आहे. परंतु, किती दिवस साठा करून ठेवावा.

सर्वाधिक नऊ हजार रुपये क्विंटल तुरीला दर...

  • लातूरच्या बाजारामध्ये सर्वाधिक तुरीला नऊ हजार रुपये प्रति क्विंटल दर आहे, तर त्या खालोखाल आठ हजार रुपये प्रति क्विंटल उडदाला भाव आहे. 
  • पण, या शेतमालाची विक्री शेतकऱ्यांनी यापूर्वीच केलेली आहे. त्यामुळे त्यांना या दराचा फायदा होत नाही, अशी स्थिती आहे. हरभऱ्यालाही जरा थोडा चांगला दर आहे. पाच हजार ५०० रुपये सर्वसाधारण प्रती क्विंटल हरभरा लातूरच्या बाजारात विकला जातोय. 
  •  सोयाबीनची आवक १३,८९३ आणि सर्वसाधारण दर ४,८५० रुपये प्रतिक्चिंटल असल्याने शेतकरी सोयाबीनचा दर कधी वाढेल, या आशेवर होते. मात्र, यंदा दर वाढला नसल्यामळे शेतकऱ्यांची निराशाच झाली आहे.
टॅग्स :सोयाबीनबाजारमार्केट यार्डलातूर