Join us

सोन्याचे दर ७५ हजार पार, कापूस होतोय ७ हजारांत ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 09:32 IST

शंभर किलो कापूस विकल्यानंतर मिळतो एक ग्रॅम सोन्याचा दागिना

सोन्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असून ७५ हजारांचा टप्पा गाठला आहे. दुसरीकडे कापसाच्या भावात वाढ न होता दिवसेंदिवस घसरणच होत आहे. एक ग्रॅम सोनं घ्यायचं असेल तर एक क्विंटल कापूस विका, अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. पिवळ्या सोन्याच्या तुलनेत शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला कवडीमोल भाव मिळत आहे. बाजारात सर्व वस्तूंचे दर वाढत आहेत.

गतवर्षी बीड जिल्ह्याच्या शिरूर कासार तालुक्यात जवळपास ३० हजार हेक्टरवर कापूस लागवड झाली होती. उत्पादनात अर्धी घट झाली असली तरी सरासरी दीड लाख क्विंटल उत्पादन झाले. सुरुवातीपासूनच भाव समाधानकारक नव्हते. थोडी वाट पाहून गरजू शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात कापूस विकला. काहींनी भाववाढीच्या आशेने घरातच थप्पीला ठेवला.

महाशिवरात्री काळात थोडी भाववाढ होऊन आठ हजारांचा टप्पा ओलांडला होती. त्यानंतर आणखी वाढ होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, झाले उलटेच. कापूस विक्रीसाठी शेतकरी तयार असल्याचे दिसून येताच पुन्हा भाव ढासळून ते सात साडेसात हजारांवर आले. सरासरी एका क्विंटलला सात हजार दोनशे असाच भाव पदरात पडतो.

अशातच सोन्याने ७५ हजार रुपये तोळा असा टप्पा गाठल्याने एका ग्रॅमला एक क्विंटल कापसाचे दाम मोजावे लागतात. रोज सोन्याची चढती, तर कापसाच्या भावाची उतरती कमान समाधानाचा उंबरठा शिवू देत नाही.

हेही वाचा - शेतकरी बांधवांनो भूक मंदावली, थकवा जाणवतोय; किडनीचा आजार तर जडला नाही ना?

टॅग्स :कापूसबाजारशेतकरीशेती