Join us
Daily Top 2Weekly Top 5

सूर्यफुलाची चमक वाढली, 'या' कारणांमुळे दरामध्ये दुपटीने वाढ, काय मिळतोय दर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 13:45 IST

Sunflower's Market : गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा दुपटीने दर वाढल्याने सूर्यफूल उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होत आहे.

- भूषण रामराजेनंदुरबार : राष्ट्रीय बाजारपेठेत सात सूर्यफुलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे नंदुरबार बाजार समितीतील सूर्यफुलाला प्रतिक्विंटल हजारापर्यंत भाव मिळत आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा दुपटीने दरवाढल्याने सूर्यफूल उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होत आहे. नंदुरबार बाजार समिती ही सूर्यफूल खरेदी करणारी धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठ आहे. 

याठिकाणी प्रतिक्विंटल ६ हजार ३०० ते ७ हजार रुपयांचा दर मिळत आहे. नंदुरबार जिल्ह्यात खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामांत सूर्यफूल पेरणी करून उत्पादन घेतले जाते. जागतिक स्तरावर कच्च्या मालाची (सूर्यफूल बिया) टंचाई, रशिया युक्रेन संघर्षामुळे तेल पुरवठ्यातील अडथळे आणि भारताकडून सूर्यफुल तेलाचे वाढते आयातीचे प्रमाण या कारणांमुळे राष्ट्रीय बाजारपेठेत सूर्यफुलाच्या दरात वाढ झाली आहे.

वाढलेल्या दरांमुळे शेतकऱ्यांना लाभएकीकडे देशात सूर्यफुलाच्या तेलाची मागणी वाढली असताना, उत्पादनात मात्र घट झाल्यामुळे आवक होत असलेल्या सूर्यफुलाची (बिया) खरेदी व्यापारी वाढवत आहेत. याचा थेट परिणाम नंदुरबार जिल्ह्यातील सूर्यफूल उत्पादकांच्या उत्पन्नवाढीवर सध्या होत आहे. नंदुरबार बाजार समितीत दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगामात साधारण अडीच ते तीन हजार क्विंटल सूर्यफुलाची आवक होते. 

सूर्यफूल नंदुरबारसह लगतच्या धुळे जिल्ह्यातून आणि लगतच्या गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यातून विक्रीसाठी आणला जातो. यंदाही रब्बी हंगामात पेरणी केलेल्या सूर्यफुलाचे उत्पादन गेल्या आठवड्यापासून बाजारात येत आहे. सोमवार आणि मंगळवारी या उत्पादनाच्या दरांमध्ये वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मोठा लाभ झाला आहे.

चार वर्षांपासून मागणी वाढल्याने दरही वाढलेचार वर्षापूर्वी सूर्यफुलाला तीन हजार रुपये प्रतिक्विंटल एवढेच दर असल्याने अनेकांनी त्याची लागवड थांबवून पर्यायी पिके निवडली होती; परंतु तीन वर्षांपूर्वी जागतिक पातळीवर रशिया आणि युक्रेन युद्धानंतर सूर्यफूल तेलाचे दर गगनाला भिडल्याने सूर्यफुलाची मागणी वाढली होती. याचा परिणाम बाजारातील कच्च्या मालाच्या वाढीव मागणीमुळे दरवाढीवर दिसून येत होता.

दरवाढ झाल्यानंतर शेतकरी पुन्हा सूर्यफुलाकडे वळत आहेत. जिल्ह्यात दोन्ही हंगामांत एकूण ३०९ हेक्टरवर सूर्यफूल लागवड गेल्या दोन वर्षांत झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यात खरीप २०२५ मध्ये १४३, तर चालू रब्बी हंगामात १६६ हेक्टरवर सूर्यफुलाची पेरणी करण्यात आली होती. सध्या बाजारात रब्बी उत्पादन येऊन त्याची विक्री सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sunflower prices surge, doubling due to global demand and supply issues.

Web Summary : Sunflower prices in Nandurbar market double due to global shortages, Russia-Ukraine conflict affecting oil supplies, and increased Indian imports. Farmers benefit from prices ₹6,300-₹7,000 per quintal. Increased demand and reduced domestic production drive the price hike, impacting local farmers positively.
टॅग्स :सुर्यफुलफुलशेतीशेती क्षेत्रमार्केट यार्डशेती