Join us

आंबा कॅनिंगला सुरवात; कसा मिळतोय दर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 9:56 AM

वाढत्या उष्म्यामुळे एकीकडे आंबा भाजत असला तरी दुसरीकडे आंबा लवकर तयार होत आहे. स्थानिक बागायतदार आंबा काढून वर्गवारी करून वाशी बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवत आहेत.

वाढत्या उष्म्यामुळे एकीकडे आंबा भाजत असला तरी दुसरीकडे आंबा लवकर तयार होत आहे. स्थानिक बागायतदार आंबा काढून वर्गवारी करून वाशी बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवत आहेत.

सध्या वाशी बाजारपेठेत पेटीचा दर १२०० ते ३५०० रुपये तर स्थानिक बाजारपेठेत ४०० ते १५०० रुपये डझन दराने आंबा विक्री सुरू आहे. त्यामुळे सध्याचे तरी दर सर्वसामान्यांना परवडणारे नसल्यामुळे आंब्याची गोडी काही चाखता येत नाही.

यावर्षी हवामानातील बदलाचा परिणाम आंबा पिकावर झाला. आंबा उत्पादन हंगामापूर्वी सुरू झाले परंतु प्रमाण अत्यल्प होते. त्यातच थ्रीप्स, तुडतुडा, बुरशी या रोगांमुळे मार्च महिन्यापर्यंत बागायतदारांना फवारण्या कराव्या लागल्या. अवकाळी पाऊस, नीच्चांक तापमान व उच्चांक तापामानाचाही फटका बसला.

सध्या तर पारा ३२ ते ३५ अंश सेल्सियसपर्यंत वाढत आहे. कडाक्याच्या उन्हामुळे आंबा लवकर तयार होत आहे. त्यातच कातळ, डोंगरावरील बागांमध्ये आंबा भाजण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आंब्यावर काळे डाग पडत आहे.  काळे डाग पडलेला आंबा बागायतदार बाजूला काढून निवडक आंबा पेटीमध्ये भरून विक्रीला पाठवित आहे.

सध्या वाशी बाजारपेठेत एक ते दीड लाख आंबा पेट्या विक्रीला येत आहेत पैकी ८० ते ८५ हजार आंबा पेट्या कोकणातील असून, उर्वरित आंबा तामिळनाडू, केरळ, कर्नाटक येथील आहे. कर्नाटक हापूस ७० ते १३०, बदामी ४० ते ६०, तोतापुरी २५ ते ३०, लालबाग ३० ते ६० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे.

सध्या कॅनिंग सुरू झाल्याने बागायतदार चार ते सहा, सात डझनच्या निवडक आंबा पेट्या भरून उर्वरित आंबा कॅनिंगला घालत आहेत. कॅनिंगला किलोला ३० रुपये दर देण्यात येत आहे. वास्तविक आंबा पिकासाठी घेण्यात येणारा खर्च व प्रत्यक्ष पेटी व कॅनिंगला मिळणारा दर अल्प असून बागायतदार अपेक्षित दर मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत.

आंब्याचा प्रकार दर (किलो रू.)कर्नाटक हापूस ७० ते १३०बदामी ४० ते ६०तोतापुरी २५ ते ३०लालबाग ३० ते ६०

कॅनिंग सुरू झाले असून, सुरुवातीलाच ३० रुपये दर जाहीर करण्यात आला आहे. वास्तविक आंबा उत्पादनासाठी येणारा खर्च व प्रत्यक्ष मिळणारा दर यामुळे गणिते विस्कटत आहेत. त्यामुळे पेटीला किमान ३ हजार तर किलोला किमान ४० रुपये दर मिळणे अपेक्षित आहे. - राजन कदम, बागायतदार

टॅग्स :आंबाशेतकरीशेतीबाजारपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्केट यार्डनवी मुंबईतापमान