Soybean Market : वाशिम बाजार समित्यांत मागील आठवड्यात सोयाबीनच्या(Soybean) दरात कंचित सुधारणा झाली. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोयाबीनच्या दरात आधीच्या तुलनेत कसलीच वाढ दिसली नाही. सोमवारी (३० डिसेंबर) रोजी जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांत सोयाबीनचे सरासरी दर ४ हजार १०० रूपये प्रति क्विंटलपर्यंतच होते. आवक मात्र १८ हजार क्विंटलवर पोहोचल्याचे दिसून आले.
डिसेंबरच्या सुरुवातीपासून सोयाबीनच्या दरात घसरण सुरू झाली होती. मागील आठवड्यापर्यंत सोयाबीनला सरासरी ४ हजार रुपये प्रति क्विंटलपेक्षाही कमी दर मिळाले होते. तथापि, मागील आठवड्याच्या अखेर गुरुवारनंतर सोयाबीनच्या दरात काहीशी सुधारणा झाली.
सोयाबीनचे कमाल दर ४ हजार २०० रुपये प्रति क्विंटलच्यावर पोहोचले होते. त्यामुळे या आठवड्यात सोयाबीनच्या दरात आणखी सुधारणा होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. प्रत्यक्षात सोयाबीनचे दर सोमवारीही स्थिरच असल्याचे दिसले.
बाजार समित्यांत आवक मात्र मोठ्या प्रमाणात झाली होती. लिलावाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यात मिळून सोमवारी १८ हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती.
आवक आणखी वाढणार!
शेतकरी सद्यस्थितीत रब्बी हंगामात व्यस्त असून, पुढे उन्हाळी हंगामाच्या तयारीसह कर्जाची परतफेड, देणीघेणीचे व्यवहारही त्यांना मार्चपूर्वी उरकावे लागणार आहेत. त्यामुळे ते सोयाबीनसह साठवलेल्या इतर शेतमालाच्या विक्रीवर अधिकाधिक भर देत असल्याने बाजार समित्यांत येत्या काही दिवसानंतर सोयाबीनची आवक दिवसेंदिवस वाढतच राहणार आहे.
कारंजा बाजार समितीत सर्वाधिक आवक !मागील आठवड्याच्या अखेरपासून इतर बाजार समित्यांच्या तुलनेत कारंजा बाजार समितीत सोयाबीनची सर्वाधिक आवक होत आहे. या बाजार समितीत शुक्रवारनंतर सोमवारीही ७ हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. तर त्या खालोखाल वाशिमच्या बाजार समितीत ६ हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. अर्थात या दोनच बाजार समित्यांत मिळून एकूण १३ हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती.
सोयाबीनला कोठे किती कमाल दर?
वाशिम | ४१५० |
कारंजा | ४२२० |
मानोरा | ४२०० |
रिसोड | ४३१० |
मंगरुळपीर | ४४५५ |
हे ही वाचा सविस्तर : Tur Bajar Bhav : सोलापूर बाजार समितीत नव्या तुरीची आवक सुरु; कसा मिळतोय दर