Join us

Soybean Market : सोयाबीन हमीभावात विकायचे? ३१ डिसेंबरपर्यंतच ऑनलाइन नोंदणी करा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 13:33 IST

सहकार व पणन विभागाने शेतकऱ्यांचे सोयाबीन, मूग व उडीद हमीभावाने विक्री करण्यासाठी १५ ऐवजी आता ३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली आहे. (Soybean Market)

Soybean Market : शेतकऱ्यांना सोयाबीन, मूग व उडीद हमीभावाने विक्री करण्यासाठी १५ ऐवजी आता ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सहकार व पणन विभागाकडून याबाबतचे आदेश काढण्यात आले आहेत. नाफेडमार्फत प्रत्येक जिल्ह्यात खरेदी केली जात आहे.

परभणी आणि अमरावती जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेऊयात. परभणी जिल्ह्यात सोयाबीन या एकमेव पिकासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी केल्याचे दिसत आहे. आतापर्यंत १२ हजार ६९० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी ५ हजार ५२१ शेतकऱ्यांना माल केंद्रावर आणण्याचा संदेश पाठविला आहे.

आतापर्यंत १८४१ शेतकऱ्यांनी ३२ हजार ८९ क्विंटल सोयाबीन हमीभाव केंद्रावर विकले. ४ हजार ८९२ क्विंटल याप्रमाणे १५ कोटी ६९ लाख रुपयांचे सोयाबीन खरेदी केले आहे. यापैकी ११२४ शेतकऱ्यांच्या १८ हजार २१ क्विंटल सोयाबीनचे ८.८१ कोटी रुपयांचे चुकारे अदा करण्यात आले आहेत.

सोयाबीनचा बाजारपेठेतील भाव अजूनही वाढला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव केंद्रावरच सोयाबीन विक्रीसाठी आणावे लागत आहे.

यासाठी ऑनलाइन नोंदणी अनिवार्य आहे. त्यामुळे काही भागांत ही नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी होत होती. यानुसार राज्य शासनाने मुदतवाढ दिली आहे. ३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे.

१२ हजार क्विंटल सोयाबीन गोदामात

जिल्ह्यात खरेदी करण्यात आलेल्या ३२ हजार ८९ क्विंटल सोयाबीनपैकी १२ हजार ५३७ क्विंटल सोयाबीन गोदामात जमा करण्यात आले आहे, तर १९ हजार ५५२ क्विंटल सोयाबीन जमा करणे बाकी आहे.

केंद्रनिहाय खरेदी क्विंटलमध्ये व रक्कम

केंद्र                                     खरेदी रक्कम
परभणी                       ३८८७ १,९०,२०,०३२
जिंतूर                            १०६२५१,९५,३०४
सेलू                               ९८३४ ४,५९,०६,५२८
मानवत                               १३९२६८,१२,११०
पाथरी                                २३४६ १,१४,७६,६३२
पूर्णा                                    ४२४६२,०७,७१,४३२
सोनपेठ                                 ३७८४ १,८५,१५,६८१
बोरी                                        २७४११,३४,११,४१८
पेडगाव                                     ३०५६१,४९.५२,३९८
वरपूड                                                ००००
झरी                                                   ००००
रुढी पाटी                                         १८८ ९,१९,६९६

१ हजार १२४ शेतकऱ्यांना चुकारे

• जिल्ह्यात १ हजार १२४ शेतकऱ्यांना १८ हजार २१ क्विंटल सोयाबीनसाठी चुकारे अदा करण्यात आले आहेत. यामध्ये सेलूमध्ये सर्वाधिक ४१२ शेतकऱ्यांना ३.१८ कोटी अदा केले.

• पूर्णा येथे १६० शेतकऱ्यांना १.४१ कोटी, पेडगाव केंद्रावर १४८ शेतकऱ्यांना १.२३ कोटी, सोनपेठ केंद्रावर ११८ शेतकऱ्यांना १.१८ कोटी रुपये, अशी सर्वाधिक सोयाबीन चुकारे अदा झालेली केंद्रे आहेत.

खासगीत 'हमी'पेक्षा भाव कमी

अमरावतीमध्ये यावर्षी ४ हजार ८९२ रुपये क्विंटल हमीभाव असला तरी बाजार समित्यांमध्ये सोयाबीन ३ हजार ८०० रुपये भावाने विकले जात आहे. यामध्ये उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे नाफेड केंद्रांवर हमीभावाने विक्री करणे हा पर्याय आहे.

ऑनलाइन नोंदणीची मुदत १५ डिसेंबरला संपत असल्याने शासनाने पुन्हा १५ दिवसांची मुदतवाढ दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस अर्थात अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे सरासरी उत्पादनात कमी आलेली आहे. अशा परिस्थितीत मागणी वाढून शेतकऱ्यांना दरवाढीची अपेक्षा असताना दरात सातत्याने घसरण होत आहे.

चार दिवसांत सोयाबीनच्या दरात क्विंटलमागे ३०० रुपयांनी घट आलेली आहे. नाफेडमध्ये अटी-शर्ती व खासगी बाजारात लूट या दोन्हीत कात्रीमध्ये शेतकरी अडकला आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीतील शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात सोयाबीनची विक्री केली, तर काही शेतकरी दरवाढीच्या प्रतीक्षेत सोयाबीनची साठवणूक करीत आहेत; त्यामुळे सोयाबीनची आवकदेखील आता कमी होत आहे. बहुतांश शेतकरी शासन खरेदी केंद्रांवर सोयाबीनची विक्री करीत आहेत. त्यातच आता नोंदणीला मुदतवाढ मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

'डीओसी'ला मागणी कमी, दरात घसरण

• सोयाबीनचे दर पशुखाद्य असलेल्या 'डीओसी' वर ठरतात. यावर्षी सोयाबीनच्या डीओसीला आंतरराष्ट्रीय बाजारात फारशी मागणी नाही. त्याचा थेट फटका सोयाबीनच्या दरवाढीवर झालेला आहे. शिवाय तेलावर १० टक्क्यांवर आयात शुल्क आकारणीमुळे दरात वाढ झालेली असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.

नाफेडच्या खरेदीची संथगती, शेतकरी त्रस्त• जिल्ह्यात डीएमओच्या नऊ केंद्रांवर १ हजार ६४१ शेतकऱ्यांचे ४२ हजार २०८ क्विंटल व व्हीसीएमएफच्या ११ खरेदी केंद्रांवर १ हजार ७६४ शेतकऱ्यांचे २९ हजार २४४ क्विंटल असे एकूण ७१ हजार ४५२ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आलेली आहे. अटी-शर्तीसह खरेदीची मंदगती असल्याने केंद्रांवर शेतकरी त्रस्त झाले आहेत.

सोयाबीनचे असे आहेत बाजारभाव (रु./क्विं.)

०६ डिसेंबर३८०० ते ४०५५
०९ डिसेंबर३८५० ते ४१००
१० डिसेंबर३७५० ते ३८७८
११ डिसेंबर ३८०० ते ३९०७
१३ डिसेंबर ३७५० ते ३९७०
१४ डिसेंबर३९५० ते ४१००
टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डअमरावतीपरभणी