Join us

Soybean Hamibhav Kendra : सोयाबीन खरेदीपोटी ३ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार 'इतके' कोटी रक्कम जमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 16:08 IST

बारदाना उपलब्ध झाल्यानंतर हमीभाव खरेदी केंद्रांवर सोयाबीनच्या खरेदीला गती देण्यात आली आहे. आतापर्यंत १२ हजार ७५८ क्विंटल सोयाबीनची खरेदी पूर्ण झाली आहे. वाचा सविस्तर (Soybean Hamibhav Kendra)

Soybean Hamibhav Kendra : बारदाना उपलब्ध झाल्यानंतर हमीभाव खरेदी केंद्रांवर सोयाबीनच्या खरेदीला गती देण्यात आली आहे. आतापर्यंत १२ हजार ७५८ क्विंटल सोयाबीनची खरेदी पूर्ण झाली आहे. यापैकी ६ हजार ३२८ क्विंटल सोयाबीनचे ३ कोटी ९ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर अदा करण्यात आले आहेत.

उर्वरित शेतकऱ्यांचेही पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी गुरुवारी (२१ नोव्हेंबर) रोजी दिली. धाराशिव जिल्ह्यातील १७ हमीभाव खरेदी केंद्रांवरून सोयाबीनची खरेदी सुरू झाली आहे.

प्रारंभी बारदाना उपलब्ध नसल्याने खरेदीला विलंब झाला. यासंदर्भात आपण फेडरेशनकडे पाठपुरावा करून बारदाना निविदा प्रक्रिया तातडीने राबवून घेतली. गतीने जिल्ह्यासाठी आवश्यक असलेला बारदाना उपलब्ध करून घेतला.

त्यामुळे आता हमीभाव केंद्रांवर खरेदीला गती मिळाली आहे. परिणामी खुल्या बाजारातही सोयाबीनचे दर वाढताना दिसत आहेत. सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांनी खुल्या बाजारात सोयाबीन विकण्याची घाई न करता नोंदणीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत दिलेल्या मुदतवाढीचा उपयोग करून घ्यावा. ज्या शेतकऱ्यांनी फेडरेशनकडे नोंदणी केलेली नाही, त्यांनी तातडीने नोंदणी करून सोयाबीन खरेदी केंद्रावरच विक्री करावी, असे आवाहन आ. पाटील यांनी केले आहे.

चार दिवसांत पैसे खात्यात

यंदा चार दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर सोयाबीनचे पैसे जमा होत आहेत. आजवर सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ३ कोटी ९ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. खरेदी केंद्रावर १२ टक्के आर्द्रतेचा निकष आहे. वाहतूक खर्चाचे नुकसान टाळण्यासाठी सोयाबीन हमीभाव केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी नेण्यापूर्वी आर्द्रतेची तपासणी करून घेण्याचे आवाहनही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

इथे आहेत सोयाबीन खरेदी केंद्र

जिल्ह्यातील भूम, दस्तापूर, गुंजोटी, ईट, नळदुर्ग, कळंब, वाशी, उमरगा, धाराशिव, सोन्नेवाडी, चिखली, शिराढोण, टाकळी बें., तुळजापूर, कानेगाव, कनगरा, चोराखळी आदी १७ ठिकाणी खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. याठिकाणी १२ हजार ७५८ क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे. यापूर्वी सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रावर नोंदणीसाठी १५ नोव्हेंबर ही मुदत देण्यात आली होती. आपण पाठपुरावा केल्यानंतर ती वाढवून ३० नोव्हेंबर करण्यात आल्याचेही आ. पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड