Join us

Shetmal Kharedi: हमीभाव खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी का फिरवली पाठ ते जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 13:26 IST

Shetmal Kharedi : शासनाने तूर, हरभऱ्याला हमीभाव जाहीर करून हिंगोली जिल्ह्यात 'एनसीसीएफ' अंतर्गत १५ केंद्र सुरू केले; परंतु या केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र यंदा पाहायला मिळत आहे. जाणून घ्या काय आहे कारण सविस्तर

हिंगोली :

शासनाने तूर, हरभऱ्याला हमीभाव जाहीर करून हिंगोली जिल्ह्यात 'एनसीसीएफ' अंतर्गत १५ केंद्र सुरू केले; परंतु या केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र यंदा पाहायला मिळत असून, २४ एप्रिलपर्यंत केवळ २ हजार ४९९ क्विंटल ५० किलो तुरीची खरेदी झाली. तर हरभऱ्याची खरेदी शून्य आहे. येणाऱ्या दिवसांतही खरेदी वाढण्याची चिन्हे कमीच आहेत. (Shetmal Kharedi )

शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा, यासाठी शासनाच्या वतीने कापूस, सोयाबीन, तूर, हरभरासह इतर शेतपिकांना हमीभाव जाहीर केला. यंदा तुरीला ७ हजार ५५० रुपये प्रतिक्विंटलचा, तर हरभऱ्याला ५ हजार ६५० रुपये भाव जाहीर केला. 

यंदा जिल्ह्यातील १५ केंद्रांवर सोयाबीनची विक्रमी खरेदी झाली. मुदतीच्या शेवटच्या दिवशीही केंद्रांसमोर सोयाबीन विक्रीसाठी घेऊन आलेल्या वाहनांच्या रांगा पाहायला मिळाल्या. यादरम्यान दोन-तीन वेळा आलेली बारदाण्याची अडचण वगळता केंद्रांवर सोयाबीनची खरेदी सुरळीत झाली. 

सोयाबीनप्रमाणे तूर आणि हरभरा खरेदी-विक्रीलाही प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यात, खुल्या बाजारात मिळणारा भाव आणि हमीभाव केंद्रांवरील भावात फारसा फरक नसल्याने शेतकऱ्यांनी मोंढ्यात तूर, हरभरा विक्री करण्यास पसंती दिली. 

प्रारंभापासूनच 'एनसीसीएफ' केंद्रावर तूर, हरभरा विक्रीसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशनलाही अत्यल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे साहजिकच केंद्रांवर अपेक्षित खरेदी होऊ शकली नाही. आता बहुतांश शेतकऱ्यांनी तूर, हरभरा विक्री केला आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांतही हमीभाव केंद्रांवर खरेदी वाढण्याची शक्यता कमीच आहे.

केंद्रांचीही उदासीनता

सोयाबीनची खरेदी करताना बारदाणा टंचाईचा सामना करावा लागला. यादरम्यान केंद्रचालकांना शेतकऱ्यांच्या रोषालाही सामोरे जावे लागले. त्यामुळेच की काय तूर आणि हरभरा खरेदीसाठी केंद्रांची उदासीनता पाहायला मिळाली. तुरीची खरेदी केवळ पाच केंद्रांवर झाली. तर हरभऱ्याची खरेदी एकाही केंद्रावर झाली नाही. हमीभाव केंद्रांवर हरभरा खरेदीची आशा धूसर आहे.

१० केंद्रावर तुरीची खरेदीच नाही जिल्ह्यात 'एनसीसीएफ' अंतर्गत असलेल्या १५ पैकी १० केंद्रांवर तुरीची खरेदीच झाली नाही. तर कनेरगाव नाका, सेनगाव, हिंगोली, नागासिंगी, आडगाव या ठिकाणच्या केंद्रांवर तुरीची खरेदी झाली आहे. तूर खरेदीसाठी यंदा केंद्रांचीही उदासीनता करणीभूत ठरल्याचे चित्र आहे.

५०३ क्विंटल तुरीचे ३८ लाख रुपये खात्यावर जमा

हमीभाव केंद्रांवर खरेदी करण्यात आलेल्या तुरीपैकी ५०३ क्विंटलचे ३८ लाख १ हजार ४२५ रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांच्या तुरीचेही पैसे लवकरच खात्यात जमा होणार असल्याची माहिती आहे; परंतु भावात फारसा फरक नसल्याने आणि रोख पैसे मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल मोंढा, खुल्या बाजारात विक्रीकडे कल राहिला.

१८७४ तूर उत्पादकांचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन

हमीभाव केंद्रांवर तूर विक्रीसाठी अगोदर ऑनलाइन रजिस्ट्रेशन करावे लागते. ११३५ शेतकऱ्यांना एसएमएस पाठवून तूर विक्रीसाठी आणावी अशा सूचना करण्यात आल्या. त्यापैकी आजपर्यंत १३५ शेतकऱ्यांकडून २ हजार ४९९ क्विंटल ५० किलो तुरीची खरेदी झाली आहे.

हरभऱ्यासाठी नोंदणी २०७; खरेदी मात्र शून्यच

जिल्ह्यातील पंधरा केंद्रांवर हरभरा विक्रीसाठी २०७ जणांनी ऑनलाइन नोंदणी केली; परंतु एकाही केंद्रावर हरभऱ्याची खरेदी झाली नाही. केंद्रावर ५ हजार ६५० रुपये हमीभाव दिला जात आहे. तर बाजार समितीच्या मोंढ्यात ५ हजार ५५० रुपये सरासरी भाव मिळत आहे. शिवाय रोख पैसेही मिळत असल्याने हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्राकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

हे ही वाचा सविस्तर : Shetmal Kharedi: हमीभावाने खरेदीसाठी ज्वारी, बाजरी व मक्याची ऑनलाइन नोंदणी सुरू; वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रतुराहरभरातूरबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड