गजानन वाघ
लाल मिरचीला (Red Chilli) उन्हाळ्यात नेहमी चढ्या दराने विक्री होते. त्यामुळे मिरची उत्पादकांना दिलासा मिळतो. परंतु यंदा मात्र मिरचीचा ठसका उतरल्याचे बाजारात पाहायला मिळत आहे. (Red Chilli Market)
बाहेर देशांतून मागणी कमी झाल्यामुळे वाळलेल्या लाल मिरचीचे (Red Chilli) दर गेल्या वर्षीपेक्षा यंदा प्रचंड घसरले आहेत. गेल्या वर्षी मिरचीला दर प्रतिक्विंटल ४० ते ६० हजार रूपये पर्यंत होते. (Red Chilli Market)
परंतु आता त्यात खूप मोठी घसरण होऊन १५ ते २५ हजार रूपये पर्यंत दर आले आहेत. यामुळे सिल्लोड तालुक्यातील लिहाखेडी परिसरातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
लिहाखेडीसह पालोद, सारोळा, अन्वी परिसरात शेतकरी मोठ्या प्रमाणात मिरचीची लावगड करतात. गेल्यावर्षी अवकाळी पाऊस, गारपीट तसेच रोगाच्या प्रादुर्भावामुळे मिरचीच्या उत्पादनात घट झाली होती. परंतु मिरचीचे दर तेजीत होते. प्रतिक्विंटल ४० ते ६० हजार रूपये पर्यंत मिरची विक्री होत होती.
या भागातील मिरची बांग्लादेश, चीनसह मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये विक्रीसाठी नेली जाते. यामुळे मिरचीतून लाखो रूपयांचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळते. (Red Chilli)
परंतु यंदा या सदर देशांतून मिरचीला मागणी नसल्यामुळे दर घसरले असून ते प्रतिक्विंटल १५ ते २५ हजार रूपये पर्यंत आले आहेत. उन्हाळ्यात मिरचीचे दर वाढलेले असतात, परंतु यंदा कमी झाल्याने मिरची उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. (Red Chilli Market)
मिरचीचे दर
* गेल्या वर्षी बेडगी वाणाच्या मिरचीचे दर प्रतिक्विंटल ४० ते ६० हजार रूपये होते. यंदा मात्र हे दर १५ ते २५ हजारांवर आले आहेत. तेजा वाणाच्या मिरचीचे दर गतवर्षी २५ ते ३० हजार रुपये होते, आता ते २० ते २५ हजारांवर आले आहेत.
* गावरान मिरचीचे दर २० ते २२ हजार रुपये होते, आत हे दर १५ ते १६ हजारापर्यंत आले आहेत. गुंटूर मिरचीचे दर ३० ते ३५ हजार रुपये होते, सध्या हे दर २५ ते २८ हजार रुपयांवर आले आहेत. ४० ते ६० हजार रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल असलेले मिरचीचे दर यंदा खूप घसरले असून ते १५ ते २५ हजार रुपयांपर्यंत आले आहेत.
गेल्या वर्षी मिरचीला प्रतिक्विंटल ४० ते ६० हजार रुपयांपर्यंत भाव होता; परंतु आता त्यात खूप मोठी घसरण होऊन तो १५ ते २५ हजार रुपयांपर्यंत आला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. - अशोक साखळे, शेतकरी, लिहाखेडी
लिहाखेडी परिसरातील मिरची मध्य प्रदेशातील भोपाळसह बांगलादेश, चीनमध्ये विक्रीसाठी नेली जाते. परंतु या भागातून मिरचीची मागणी कमी झाल्यामुळे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. वास्ताविक पाहता उन्हाळ्यात मिरचीचे दर तेजीत असतात. परंतु यंदा या उलट घडले आहे. यामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे ही नुकसान झाले आहे.- दीपक काळात्रे, मिरची व्यापारी, लिहाखेडी