Join us

हिंगोलीत मार्केट यार्डाबाहेर दोन दिवस आधीच हळद विक्रीसाठी वाहनांच्या रांगा 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 9:25 AM

७ दिवसांच्या बंदनंतर सोमवारपासून खरेदी

हळद खरेदी-विक्रीसाठी मराठवाड्यासह विदर्भात प्रसिद्ध असलेल्या हिंगोली येथील मार्केट यार्डातील हळद खरेदी-विक्रीचे व्यवहार सात दिवसांच्या बंदनंतर २० मेपासून सुरळीत होणार आहेत. शेतकरी मात्र दोन दिवस अगोदर १८ मेपासूनच वाहनाद्वारे हळद घेऊन दाखल झाले असून, मार्केट यार्डबाहेरील रस्त्यावर जवळपास एक ते दीड किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग लागली आहे.

हिंगोलीबाजार समितीच्या मार्केट यार्डात जिल्ह्यातील स्थानिक शेतकऱ्यांसह नांदेड, परभणी तसेच विदर्भातील यवतमाळ, वाशिम, वर्धा या जिल्ह्यांतील शेतकरीही हळद विक्रीसाठी आणतात. हळदीचे रोख पैसे आणि मोजमापातील विश्वासार्हतेमुळे शेतकरी या मार्केट यार्डात हळद विक्रीला प्राधान्य देतात. सध्या याठिकाणी जवळपास तीन ते चार हजार क्विंटल हळदीची आवक होत आहे. एवढ्या हळदीचे बीट आणि मोजमाप करणे शक्य होत नसल्याने शेतकऱ्यांना मुक्काम करावा लागत आहे.

त्यातच यार्डातील टिनशेडमध्ये जागा शिल्लक नसल्यामुळे १३ मेपासून हळद खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला होता. त्यानंतर व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या हळदीच्या थप्प्या इतरत्र हलविण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यामुळे आता टिनशेडमध्ये जागा झाली असून, २० मेपासून हळद खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू होणार आहेत.

मुक्कामाची वेळ येऊ नये यासाठी अनेक शेतकऱ्यांनी शनिवारीच मार्केट यार्ड जवळ केले. त्यामुळे रात्री ८ वाजेपर्यंत यार्डाबाहेरील रेल्वे स्टेशन रोडवर जवळपास एक ते दीड कि. मी. पर्यंत वाहनांची रांग लागली होती.

सरासरी मिळतोय १६ हजारांचा भाव...

• हिंगोली येथील मार्केट यार्डात सध्या हळदीला सरासरी १६ हजारांचा भाव मिळत आहे.

• तर जास्तीत जास्त १८ हजारांपर्यंत हळदीची विक्री होत आहे. पुढील काही दिवसांत आणखी भाव वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तविली जात आहे.

दहा हजार क्विंटलवर आवक होण्याची शक्यता

• १३ मेपासून हळदीचे बीट बंद होते. त्यामुळे आता २० मे रोजी जवळपास दहा हजार क्विंटलवर हळद विक्रीसाठी येण्याची शक्यता बाजार समितीचे सचिव नारायण पाटील यांनी वर्तविली.

• याठिकाणी दाखल होणाऱ्या वाहनांची नोंद करून घेण्यात येत असून, क्रमांकानुसार वाहने मार्केट यार्ड आवारात सोडण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा - हळदीला मिरचीची दिली जोड; सुभाषरावांचे दोन्ही पिकातून उत्पन्न झाले गोड

टॅग्स :बाजारहिंगोलीशेतकरीशेतीपीकमार्केट यार्डमार्केट यार्ड