Join us

आंबेमोहोर खातोय भाव; मागणी वाढल्याने सुगंधी तांदळाच्या दरात लक्षणीय वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 13:08 IST

Rice Market Rate : गणेश उत्सवादरम्यान खास मोदक तयार करण्यासाठी वापरला जाणारा आंबेमोहर तांदूळ सध्या दोनशे रुपये प्रति किलोने बाजारात विकला जात आहे. हा आतापर्यंतचा सर्वाधिक दर असल्याने व्यापारी सांगत असून, सुगंधी तांदळाला सध्या बाजारात चांगली मागणी असल्याने दर वाढल्याचे चर्चिले जात आहे.

गणेश उत्सवादरम्यान खास मोदक तयार करण्यासाठी वापरला जाणारा आंबेमोहर तांदूळ सध्या दोनशे रुपये प्रति किलोने बाजारात विकला जात आहे. हा आतापर्यंतचा सर्वाधिक दर असल्याने व्यापारी सांगत असून, सुगंधी तांदळाला सध्या बाजारात चांगली मागणी असल्याने दर वाढल्याचे चर्चिले जात आहे.

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर केवळ लातूर जिल्ह्याच्या उदगीर बाजारात आंबेमोहरच नव्हे, तर इतर सुगंधित तांदळाच्या दरात देखील लक्षणीय वाढ झाली आहे. यासोबतच नेहमी वापरल्या जाणाऱ्या तांदळाचे दर सुद्धा वाढले आहेत. 

डिसेंबरपर्यंत दर चढेच राहणार...

आंबेमोहोर तांदळाच्या दरात झालेली वाढ डिसेंबरपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. सध्या सणासुदीचा काळ असून सातत्याने तांदळाला चांगला उठाव आहे. त्यामुळे मागणी-पुरवठ्याची साखळी असंतुलित असल्याकारणाने दर चढेच राहतील, असे व्यापारी सांगत आहेत.

लातूर जिल्ह्यात कुठल्या तांदूळाला काय भाव ?

प्रकार भाव 
आंबेमोहर १८० ते २००  
बासमती १३० ते १५० 
कालीमुछ ७५ ते ८० 
चिनोर७५ ते ८० 
इंद्रायणी ६० ते ६५ 

खास मोदकासाठी होतो आहे वापर...

आंबेमोहोर तांदूळ खास मोदक तयार करण्यासाठी वापरला जातो. गणेश उत्सवाच्या काळात या सुगंधी तांदळाची मागणी इतर तांदळाच्या तुलनेत जास्त वाढते. कारण, मोदकाची चव आणि गुणवत्तेसाठी हा तांदूळ उच्च दर्जाचा मानला जातो. त्यामुळे सणासुदीच्या काळात आंबेमोहोरचा वापर वाढतो आणि त्यामुळे त्याचा परिणाम दरवाढीवर होतो.

इतरही तांदळाच्या दरातही झाली वाढ...

सुगंधी तांदळा सोबतच इतर प्रकारच्या तांदळाच्या दरामध्ये प्रतिक्विंटल २०० ते ४०० रुपयांची वाढ झाली आहे. वाढलेल्या मागणीमुळे बाजारात तांदळाच्या किमतीवर लक्षणीय प्रभाव पडला आहे. विशेषतः सुगंधी बासमती, कालीमुच्छ, चिनोर, इंद्रायणी यासारख्या तांदळाची मागणी वाढल्याने त्याच्या दरातसुद्धा वाढ झाली आहे.

उत्पादनात घट झाली आणि मागणी वाढली...

पावसाच्या अनियमिततेमुळे आंबेमोहोर तांदळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. तसेच विविध कारणाने तांदळाची बाजारातील आवकही घटली आहे. तसेच सण-समारंभामुळे ग्राहकांची मागणीही वाढली आहे. त्यामुळे तांदळाचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने फटका ग्राहकांना बसतो आहे. नाईलाने ज्यादा पैसे देऊन तांदूळ खरेदी केले जात आहे.

सध्या सणासुदीचा काळ सुरू झाला आहे. त्यामुळे मागणी पुरवठ्यात मोठ्या प्रमाणात तफावत निर्माण झाली आहे. याचा परिणाम दरवाढीवर झाला असून, आंबेमोहोर आणि बासमतीसारख्या प्रीमियम तांदळाचे भाव यावर्षी खूप वाढले आहेत. मागील काही दिवसापासून इतर तांदळाच्या दरात सुद्धा प्रति क्विंटल २०० ते ४०० रुपयांची दरवाढ झाली आहे. - प्रणव बागडी, व्यापारी, उदगीर जि. लातूर.

हेही वाचा : इंजनगावच्या शेतकऱ्याचा 'विनाखर्च शेती' चा प्रयोग यशस्वी; दीड एकरांत मिळाले दीड लाखांचे उत्पन्न 

टॅग्स :बाजारमार्केट यार्डमार्केट यार्डशेती क्षेत्रलातूर