Join us

तुरीला मिळतोय वाढीव भाव; पण डाळीसाठी तूरच शिल्लक नाही ना राव!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2024 10:14 AM

उद्योजकांकडे ४० हजार क्विंटल डाळीचा तुटवडा

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील देशी तूर उत्पादनात यंदा घट आली आहे. यामुळे नवापूर आणि परिसरातील डाळ उद्योग यंदा संकटात आहे. डाळ तयार करणाऱ्या उद्योजकांकडे वर्षभर पुरेल एवढा तूर शिल्लक नसल्याने यंदा उद्योगावर अवकळा आहे. दुसरीकडे बाजारात तूरीचे भाव प्रतिक्विंटल १२ हजार रुपयांपर्यंत गेल्याने आर्थिक ताळमेळ बसत नसल्याने डाळ उद्योगाला घरघर लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुका हा पारंपरिक शेतीसाठी ओळखली जातो. तालुक्यात पिकवला जाणारी देशी तूर ही भौगोलिक मानंकन प्राप्त आहे. या तूरमधील पौष्टिक घटकांमुळे त्यापासून तयार होणाऱ्या डाळीला देशभर मागणी आहे. परिणामी नवापूर तालुक्यात दरर्षी सरासरी १४ हजार हेक्टर क्षेत्रात देशी वाणाची तूर पिकवली जातो. या भागातील शेतकऱ्यांसाठी तूर हे महत्त्वपूर्ण पीक आहे.

यातून शेतकऱ्यांनी २०२३ मधील खरीप हंगामाच्या शेवटी तूरीची पेरणी केली होती. परंतू संपूर्ण खरीप हंगामात नवापूर तालुक्यात ब्रेक देणाऱ्या पावसाने तूर पिक ऐनफुलोऱ्यावर आले असताना नोव्हेंबर महिन्यात हजेरी लावली होती. परिणामी फुलोरा आणि काही प्रमाणात बाहेर आलेल्या शेंगांवर बुरशी आणि अळ्या पडून उत्पादन मोठी घट आली. यातून एकरी १० क्विंटल उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना दीड क्विंटलपर्यंत समाधान मानावे लागले. यामुळे तूर उत्पादकांना फटका बसला.

तूर उत्पादनाला बसलेल्या या फटक्याचा परिणाम नवापूरात डाळ उद्योगावर थेट झाला आहे. तूर नसल्याने डाळ उद्योजकांकडून विदर्भ आणि मराठ वाड्यातून लाल किंवा पांढरा तूर मागवून डाळ उत्पादन करावे लागत आहे. परंतू तेथूनही तुरळक असा साठा येत असल्याने कामकाजावर परिणाम झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

जेवढी तूर हाती तेवढेच उत्पादन सुरु ...

नवापूरातील डाळ उद्योजक दरवर्षी सरासरी ८० हजार क्विंटल डाळीचे उत्पादन करतात. शेतकऱ्यांकडून किंवा मार्केट फेडरेशनकडून खरेदी केलेला तूर घेऊन त्यावर प्रक्रिया करत डाळ तयार केली जाते. या उद्योजकांकडून यंदा केवळ २० हजार क्विंटल उत्पादन आतापर्यंत झालं आहे. अद्याप त्यांच्याकडे १० ते १५ हजार क्विंटल तूर आहे.

यातून २० हजार क्विंटलपेक्षा अधिक उत्पादन येण्याची शक्यता आहे. परंतू हे उत्पादन केवळ ४० हजार क्विंटल असून उर्वरित ४० हजार क्विंटल उत्पादनाचा तुटवडा राहणार आहे. सद्यस्थितीत उद्योगांकडून जेवढी तूर तेवढेच डाळ उत्पादन अशी स्थिती असल्याची माहिती देण्यात आली आहे. वर्ष संपेपर्यंत माल शिल्लक न राहिल्यास उद्योगांना पर्याय मार्ग शोधावा लागणार आहे.

सध्या आम्ही जेवडा माल शिल्लक आहे त्यावर प्रक्रिया करत आहोत. कच्चा माल उपलब्ध झाल्यास डाळ उत्पादनाचा वेग वाढणार आहे. येत्या वर्षभर ही स्थिती राहिल्यास पर्याय म्हणून बाहेरून कच्चा माल खरेदी करून आणत उद्योग सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. नवापूरची तूर हा संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. मागणी तेवढा पुरवठा करतानाच अडचणी येतात. आता तूरच नसल्याने समस्या वाढल्या आहेत. - विपिनभाई चोखावाला, डाळ उद्योजक, नवापूर.

गेल्या वर्षीच्या अवकाळी पावसामुळे तूर खराब झाली होती. संपूर्ण तालुक्यात एकरी उत्पादन घटले होते. यामुळे डाळ उद्योगही संकटात आहे. घरगुती डाळ उद्योजकांनाही मंदीचा सामना करावा लागत आहे. - रशिद गावित, गट शेती प्रवर्तक, धनराट ता. नवापूर.

गट शेती करणारे शेतकरीही हतबल

नवापूर तालुक्यात गटशेती करणारे शेतकरीही डाळ उत्पादन करतात. यातील बहुतांश शेतकऱ्यांची डाळ ही परदेशात जाते. या शेतकऱ्यांना १२ ते १५ क्चेिटल डाळीच्या ऑर्डरी देण्यात आल्या होत्या. परंतु यंदा मालच नसल्याने बहुतांश गटांकडून व्यापारी वर्गाला नकार कळवण्यात आला होता.

यातून शेतकरी गटांचे आर्थिक नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी प्रतिक्विंटल सात हजारावर असलेला तूर आता थेट १२ हजार रुपये प्रतिक्विंटल असल्याने शेतकऱ्यांकडून आश्चर्यही व्यक्त होत आहे. सध्या हातात मालच नसल्याने शेतकऱ्यांचाही नाईलाज झाला आहे.

हेही वाचा - एकरात लाखोंची कमाई देणारी तूर भारी; ऊस, कपाशीला आता नको म्हणतोय शेतकरी

टॅग्स :तूरपीकशेतीशेतकरीविदर्भ