शिवजयंतीमुळे राज्यात आज अनेक बाजारसमित्या बंद आहेत, मात्र शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून लासलगावची उपबाजार समिती असलेली विंचूर बाजारसमिती प्रत्येक सुटीप्रमाणेच आजही सुरूच होती. दुपारी बाजारसमितीत पोहोचलो, तेव्हा समितीचा कर्मचारी आलेल्या शेतकऱ्यांना माईकवरून सूचना देण्यात व्यग्र होता. सकाळच्या सत्राचे लिलाव झाले होते आणि आता लवकरच दुपारच्या सत्राचे लिलाव सुरू होणार होते.
त्यासाठी टॅक्टर, टेम्पो घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांची लगबग सुरू होती. काही शेतकऱ्यांनी लाल कांद्याचे टॅक्टर बाजार समितीच्या लिलाव आवारात नंबरसाठी लावून ठेवलेले होते. आता लवकरच लिलाव सुरू होईल आणि आपल्याला चांगला भाव मिळेल, अशी आशा त्यांच्या चेहऱ्यावर होती.
बाजारसमितीच्या छोटेखानी कार्यालयाच्या दाराशीच काही शेतकऱ्यांसोबत चर्चा करत असलेले संचालक छबुराव जाधव यांची भेट झाली. बाजूलाच प्रभारी सहसचिव महेश धामणे हेही होते. कांदा निर्यातबंदी हटल्यानंतरची शेतकऱ्यांची ती चर्चा होती. नमस्कार वगैरे झाल्यानंतर संचालकांच्या कार्यालयातच याच विषयावर चर्चा सुरू झाली.
‘काय मग आजचे बाजारभाव वाढले की नाही?’ आपला प्रश्न.
‘वाढले ना, शनिवारपेक्षा आज सरासरी कांदा बाजारभावात सहाशे ते सातशे रुपयांचा फरक पडलाय. वाढलेत भाव आज,’ संचालक जाधव माहिती देतात.
‘पुढेही असेच वाढणार का? मग’ आपण मुद्याचा प्रश्न विचारत अंदाज घेतो.
‘भाव वाढतील, पण किती ते अजून तरी नाही सांगता येणार. कारण कांदा निर्यातबंदी मागे घेतल्याचे नोटीफिकेशन अजून मिळाले नाही, ना ई-मेल. हे सर्व आम्हाला तुमच्या बातम्या, चॅनेलच्या बातम्या यावरूनच समजलं. नोटीफिकेशन मिळेपर्यंत व्यापाऱ्यांतही संभ्रम असणार’. श्री. जाधव स्पष्टीकरण देतात.
आज १९ फेब्रुवारी म्हणजे महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांची जयंती. लासलगांव-विंचूर बाजारसमितीत सकाळीच शिवजयंतीचा कार्यक्रम पार पडला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवून त्याची पूजा करण्यात आलेली दिसत होती. या दिवशी सरकारी कार्यालयांना सुटी असते. मात्र तरीही विंचूर बाजारसमिती शेतकऱ्यांच्या कांद्यासाठी सुरू ठेवण्यात आलेली होती.
‘‘रविवारची सुटी आणि दिवाळीच्या चार दिवसांची सुटी सोडली, तर शक्यतो आम्ही बाजारसमितीत सुटी घेत नाही. नाही तर शेतकऱ्यांची गैरसोय होते,’’प्रभारी सहसचिव धामणे माहिती पुरवतात.
‘‘कांदा निर्यातबंदी होण्याआधी शनिवारी दिनांक १७ फेब्रुवारी रोजी विंचूर बाजारसमिती कांद्याचे कमीत कमी दर ६००, जास्तीत जास्त १४००, तर सरासरी १२८० रुपये प्रति क्विंटल होते. आज १९ फेब्रुवारी रोजी त्यात वाढ झाली आणि कमीत कमी १ हजार रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त २१०१ आणि सरासरी १८०० रुपये असा दर मिळालाय. म्हणजे सहाशे ते सातशे रुपयांची वाढ झालीय’’ श्री. धामणे जवळच्या कागदावरून आपल्याला माहिती देतात.
यंदा कांदा उत्पादकांना केंद्राची धरसोड धोरणवृत्ती आणि पावसाची दांडी तर कधी गारपीट अशा दोन्ही प्रकारच्या लहरींचा सामना करावा लागला. त्यामुळे उत्पादन खर्चाच्या तुलनेत त्यांना तोटाच सहन करावा लागला. त्यातही यंदा नवीन लाल कांदा बाजारात येत असताना शेतकऱ्यांना सरासरी ३३०० रुपये प्रति क्विंटलच्या आसपास भाव मिळत होते. मात्र अचानक आलेल्या अवकाळी पावसाने आणि गारपीटीने अनेक शेतकऱ्यांच्या काढलेला ५० ते ६०% कांदा शेतातच सडला. त्यातूनही ज्या शेतकऱ्यांचा कांदा वाचला, ते विक्रीसाठी मार्केटमध्ये नेणार त्याच्या आधीच ८ डिसेंबर रोजी केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी जाहीर केली. त्यामुळे कांद्याचे दर एकदम घसरले आणि १२०० रुपयांवर खाली आले. त्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. रुपयांच्या भाषेत हे नुकसान काही हजार कोटींचे होईल.
शेतकऱ्यांकडचा साठवलेला उन्हाळी कांदा नोव्हेंबर अखेर संपतो, तर डिसेंबरच्या पहिल्या -दुसऱ्या आठवड्यापासून नाशवंत असा लाल किंवा रांगडा कांदा बाजारात येऊ लागतो. पण भाव वाढीच्या भीतीने केंद्राने नवा लाल कांदा बाजारात आणल्याबरोबर आधी निर्यातशुल्क वाढवले आणि नंतर थेट बंदीच घातली. त्यातून नुकसान शेतकऱ्यांचेच झाले.
बाजारसमितीत आज कांदा विक्रीला आलेले शेतकरी हीच व्यथा मांडत होते. मरळगोई, ता. निफाडचे जनार्दन जगताप हे त्यापैकीच एक. ‘‘आमच्याकडे आता कांदाच शिल्लक नाही. हा शेवटचा कांदा आहे. तेव्हा निर्यातबंदी मागे घेतल्याचा खरच सामान्य शेतकऱ्यांना किती फायदा होणार, तुम्ही सांगा’’, जरा वैतागूनच ते बोलत होते. श्री. जगताप यांनी खरीपात पावणेदोन एकर लाल कांदा केला. विक्रीसाठी टॅक्टर भरायचा, त्याच दिवशी नाशिक जिल्हयात झालेल्या गारपीटीत त्यांचा कांदा जागेवरच सडला. त्यातून सावरत काही कांदा त्यांनी बाजारात विक्रीसाठी नेला, नेमके त्याच दिवशी अचानक निर्यातबंदी झाली आणि त्यांना अवघ्या १२०० रुपये बाजारभावावर समाधान मानावे लागले. एकूणच या हंगामात त्यांना तोटाच झाला. आता त्यांची आशा उन्हाळी कांद्यावर टिकून आहे.
कृषी विषयक बातम्या मिळवण्यासाठी लोकमत ॲग्रो व्हॉटसअप ग्रुप इथे जॉईन करा!हरिभाऊ शिंदे हेही आपला कांदा घेऊन आले होते. जरा निराश वाटत होते. शेतकऱ्यांशी चर्चा सुरू असताना ते जवळ आले आणि सांगू लागले की आमचा बराच कांदा आता विकला गेलाय, आता केवळ चिंगळ्या शिल्लक आहेत, आता निर्यात खुली झाल्याचा आम्हाला काय उपयोग होणार, तेव्हाच करायला पाहिजे होती निर्यात खुली.
शेतकरी रामभाऊ जगताप यांनी निर्यातबंदी संदर्भात वेगळाच मुद्दा मांडला. ते म्हणाले की मध्यंतरी केंद्रीय समिती नाशिकमध्ये कांद्याची उपलब्धता किती आहे, त्याची पाहणी करायला आली, पण त्यांनी शेतकरी प्रतिनिधी, बाजारसमितीचे संचालक यांना घेऊन पाहणी केली असती, तर त्यांना समजले असते, की कांदा पुरेसा आहे. मात्र त्यांनी चुकीचा अहवाल दिला आणि त्यातून भाववाढीच्या भीतीपोटी केंद्राने कांदा बंदीचा निर्णय घेतला.
कांदा निर्यात खुली झाली, पण ३ लाख मे. टन निर्यात पुरेशी नाही ती आणखी व्हायला पाहिजे तरच शेतकऱ्याला चांगले भाव मिळतील अशी भावना अनेक शेतकऱ्यांनी बोलून दाखविली. लाल कांद्याला नाही, पण मार्चमध्ये येऊ घातलेल्या उन्हाळी कांद्याला तरी या निर्यात खुली करण्याच्या निर्णयाचा उपयोग होऊ देत, अशी शेतकऱ्यांची भावना आहे.
आज लासलगावची उपबाजार समिती असलेल्या विंचूर बाजारसमितीत कांद्याला ६०० रुपयांनी वाढीव भाव मिळाला, पण उद्या मिळेल का? याबाबत अजूनही व्यापारी आणि शेतकरी दोघांमध्ये संग्रम आहे. याचे कारण म्हणजे कांदा निर्यात बंदी हटविल्याचा अधिकृत शासकीय आदेश, नोटीफिकेशन कुणालाच प्राप्त झालेले नाही. त्यातही सोशल मीडियावर विविध चर्चा असल्याने त्यामुळेही संभ्रम वाढतोय. कांदा व्यापारी राहुल जाधव म्हणाले की आज आम्ही वाढीव भावाने खरेदी केली, पण उद्या नोटीफिकेशन नाही निघाले, तर आजची आमची गुंतवणूक वाया जाण्याची भीती आहे. मलाच नाही, सगळ्याच व्यापाऱ्यांना. त्यामुळे आम्ही सर्वच वेट ॲड वॉचच्या भूमिकेत आहोत.
कांदा निर्यातबंदी खुली केल्याची माहिती विविध माध्यमांनी केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री यांच्या हवाल्याने दिली खरी पण अजूनही कांदा उत्पादक शेतकरी संघटनांसह, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना प्रतिक्षा आहे ती याबाबतच्या अधिकृत नोटीफिकेशनची, त्यानंतरच कांदा वाढेल, पडेल कि स्थिर राहिल हे स्पष्ट होईल.
शिवजयंतीचे कांदा बाजारभाव
बाजार समिती | जात/प्रत | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|
19/02/2024 | |||||
लासलगाव | लाल | 8935 | 1000 | 2101 | 1800 |
लासलगाव - निफाड | लाल | 2440 | 1000 | 2121 | 1850 |
राहूरी -वांबोरी | लाल | 1834 | 200 | 2000 | 1400 |
संगमनेर | लाल | 3676 | 200 | 2411 | 1305 |
पुणे-मोशी | लोकल | 214 | 500 | 1000 | 750 |
मंगळवेढा | लोकल | 344 | 200 | 2000 | 1300 |