Join us

उत्साहवर्धक : विंचूर बाजारसमितीत कांदा लिलाव सुरू, असे मिळाले कांदा बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 11:29 AM

अनेक दिवसांनंतर लासलगावच्या विंचूर उपबाजारसमितीत आज २८ सप्टेंबर रोजी कांदा लिलावांना (onion market price) सुरूवात झाली. आजचे कांदा बाजारभाव असे आहेत.

अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर लासलगाव बाजारसमितीचे उपबाजार असलेल्या विंचूर बाजारसमितीत लिलावाला पुन्हा एकदा सुरूवात झाली. विंचूर उपबाजार समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी ५३० नग कांदा आवक झाली. एकूण सुमारे  ७ ते ८ हजार क्विंटल कांदा आवक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.    

गणेशचतुर्थीच्या दुसऱ्या दिवसापासून व्यापाऱ्यांच्या संपामुळे कांदा लिलाव बंद होते. त्यानंतर तब्बल आठ दिवसांनी केवळ विंचूर उपबाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी लिलाव पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला. आज दिनांक २८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दर्शीच्या मुहूर्तावर विंचूर बाजारसमितीत सकाळपासूनच शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. येवला, वैजापूर, कोपरगाव अशा सुमारे १३ तालुक्यातील शेतकरी कांदा विक्रीसाठी येथे आले आहेत.

कांदा लिलावासाठी जमलेले शेतकरी व व्यापारी ( छायाचित्र: महेश धामणे, विंचूर उपबाजारसमिती)

बाजारसमितीत सकाळी साडेआठच्या सुमारास लिलावाला प्रारंभ होताच, शेतकऱ्यांनी जल्लोषात त्याचे स्वागत केले. कर्मचाऱ्यांमध्येही उत्साह दिसून आला. सकाळी दहा वाजेपर्यंत लिलाव सुरू होते. त्यानंतर ११ च्या सुमारास पुन्हा लिलावांना प्रारंभ झाला.

आज कमीत कमी बाजारभाव १ हजार रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त २४०१ रुपये प्रति क्विंटल असे कांदा बाजारभाव होते. तर सरासरी बाजारभाव २१७५ रुपये प्रति क्विंटल असे होते. दरम्यान आज गणपती विसर्जनामुळे केवळ सकाळच्या सत्रातील लिलाव सुरू असून उद्या शुक्रवार दिनांक २९ सप्टेंबर २३ पासून कांदा लिलाव नेहमीच्या वेळांत सुरू होणार असल्याची माहिती विंचूर उपबाजारसमितीतर्फे देण्यात आली.

दि.२८/०९/२०२३ विंचूर उप-बाजार समितीचे पहिल्या सत्रात झालेले एकूण कांदा लिलाव 

उन्हाळा कांदा -५३०गोल्टी+गोल्टा बाजारभावक.क.   - ००जा. जा. -००स.सा. -  ००  उन्हाळा कांदा बाजारभावक.क.- १०००जा.जा.- २४०१स. स.- २१७५  

काल झाला निर्णय  दरम्यान विंचूर बाजारसमितीचे सहसचिव अशोक गायकवाड यांनी लोकमत ॲग्रोला सांगितले की गुरुवार दि. २८ सप्टेंबर २३ रोजी विंचूर उपबाजार आवारावरील कांदा लिलाव हे पूर्ववत सुरू होत आहेत. मात्र अनंत चतुर्दशी असल्याने विंचूर उपबाजारआवारावरील कांदा व धान्य लिलाव हे  सकाळीच्या सत्रात सकाळी साडेआठ ते अकरा या वेळेत होतील. दुपारी गणेश विसर्जनामुळे लिलाव बंद राहतील. त्यानंतर शुक्रवार दिनांक २९/०९/२०२३ पासून कांदा लिलाव हे पूर्ववत सुरू राहणार आहेत. यासंदर्भातील जाहीर सूचनाही शेतकऱ्यांना देण्यात आली आहे.

कांदा लिलाव सुरळीत होत असले, तरी सध्या हा निर्णय केवळ विंचूर येथील व्यापाऱ्यांनी घेतला असून लासलगाव आणि पिंपळगावसह अन्य बाजारसमित्यांचे व्यापाऱ्यांच्या लिलाव पूर्ववत करण्याच्या भूमिकेबाबत अजून काही समजू शकलेले नाही. याबद्दल लासलगाव बाजारसमितीचे सचिव श्री. वाढवणे यांनी सांगितले की हे लिलाव केवळ विंचूर बाजारसमितीतच सुरू होत आहेत. लासलगावबाबत अजूनही निर्णय झालेला नाही.

टॅग्स :कांदापुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेतकरीगणेश विसर्जन