खुल्या बाजारात सोयाबीनचे दर घसरले. परिणामी, शेतकऱ्यांनी 'नाफेड'च्या खरेदी केंद्राकडे (Nafed Center) सोयाबीन विक्रीसाठी धाव घेतली. यातून हमी केंद्रांवर शेतकऱ्यांची एकच गर्दी झाली.
ही गर्दी रोखण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्याचा मार्ग निवडण्यात आला. यात नोंदणी केल्यानंतर सोयाबीन खरेदीसाठी शेतकऱ्यांना मेसेज पाठविले जाणार होते. ही प्रक्रिया पार पाडतांना जागेची उपलब्धता आणि मनुष्यबळ याचा विचार झाला. यातून अखेरच्या तारखेनंतरही साडेचार हजार शेतकऱ्यांना (Farmer) सोयाबीन विकता आले नव्हते.
यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शुक्रवारी (३१ जानेवारी) रोजी मार्केटिंग फेडरेशन (Marketing Federation) आणि विदर्भ कोऑपरेटिव्ह (Vidarbha Co-operative) मार्केटिंग फेडरेशन केंद्रावर एकच गर्दी केली होती.
यातील प्रत्येक शेतकऱ्याला सोयाबीन विक्री करायची होती. मात्र, सोयाबीन खरेदीसाठी ठराविक मुदत असल्याने या मुदतीत शेतकऱ्यांना सोयाबीन विकता आले नाही. यापूर्वी सोयाबीन खरेदीसाठी केंद्र शासनाने मुदत वाढवून दिली होती.
आता राज्य शासनाचे अवर सचिव संगीता शेळके यांनी ६ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढीचे आदेश काढले आहेत.
१५ हमी केंद्रांना मिळाला दिलासा
२६ हजार शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी केंद्रांवर नोंद केली आहे. शेतकऱ्यांना पुढील सहा दिवसात सोयाबीन विकावे लागणार आहे.
'व्हीकेजीबी'वर विश्वास
विदर्भ कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनने सात केंद्रावर खरेदी केली. याठिकाणी १६ हजार १०४ शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीकरिता नोंद केली होती. ३१ जानेवारीपर्यंत या केंद्रांवर १४ हजार २९६ शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री केली. एक हजारावर शेतकन्यांना अजूनही सोयाबीन विकता आले नाही.
शेतकरी खरेदीच्या प्रतीक्षेत
जिल्ह्यातील साडेचार हजार शेतकऱ्यांना सोयाबीन विकता आले नाही. याला अनेक बाबी कारणीभूत ठरल्या आहेत. सोयाबीनची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. त्या तुलेनत खरेदी झालेले सोयाबीन ठेवायचे कुठे, असा प्रश्न आहे. यामुळे अखेरच्या दिवशी केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची सोयाबीन विक्रीसाठी गर्दी होती. आता सहा दिवस अतिरिक्त्त उपलब्ध झाले आहेत.
एक लाख क्विंटल सोयाबीनची खरेदी बाकी
विदर्भ कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन आणि मार्केटिंग फेडरेशन या दोन्ही केंद्रांवर आतापर्यंत पावणे चार लाख क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे. यात व्हीकेजीबीने दोन लाख १३ हजार ९४३ क्विंटल सोयाबीनची खरेदी केली. तर मार्केटिंग फेडरेशनने एक लाख ६१ हजार २४० क्विंटल सोयाबीनची खरेदी केली आहे.
केंद्रांवर झाली मार्केटिंग फेडरेशनची स्थिती बिकट
मार्केटिंग फेडरेशन आठ केंद्रांवरून सोयाबीनची खरेदी करीत आहे. या आठ केंद्रांवर १० हजार ६६६ शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी नोंद केली होती. यातील ७ हजार शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी करण्यात आली. अजूनही साडेतीन हजार शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी झाले नाही.
शुक्रवारी पोहचले मुदतवाढीचे आदेश
केंद्र शासनाने राज्यात ६ फेब्रुवारीपर्यंत सोयाबीन खरेदीला मुदतवाढ दिल्याचे वृत्त वृत्तवाहिन्यांवर झळकले. सायंकाळी उशिरा मुदतवाढीचे आदेश यंत्रणेकडे पोहोचले. यामुळे शेतकऱ्यांपुढील पेच संपला आहे.