Join us

NAFED centers : नाफेड केंद्रांची आज डेडलाइन: शेतकरी सोयाबीन विक्रीपासून राहणार का वंचित?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 16:17 IST

NAFED centers : नाफेडच्या २० केंद्रांवर सोयाबीन खरेदीसाठी १२ जानेवारी डेडलाइन देण्यात आलेली आहे. अद्याप ऑनलाइन नोंदणी केलेल्या १० हजारांवर शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी बाकी आहे. त्यामुळे किमान ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.

अमरावती : नाफेडच्या(NAFED) २० केंद्रांवर सोयाबीन खरेदीसाठी १२ जानेवारी डेडलाइन(Deadline) देण्यात आलेली आहे. अद्याप ऑनलाइन नोंदणी केलेल्या १० हजारांवर शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी बाकी आहे. त्यामुळे किमान ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.

खासगी बाजारात हमीभावापेक्षा १ हजार रुपयाने कमी भावाने सोयाबीनची खरेदी होत असल्याने नाफेडद्वारा हमीभावाने सोयाबीनची खरेदी केल्या जाते.

जिल्ह्यात डीएमओची ९ तर व्हीसीएमएफची ११ खरेदी केंद्र आहेत. याच केंद्रांवर शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करावी लागली. मात्र, मुदत ६ जानेवारीला संपल्याने हजारो शेतकरी नोंदणीपासून वंचित राहिले आहेत.

त्यातच आता १२ जानेवारीला खरेदीची मुदत संपत आहे. १२ जानेवारीला रविवार असल्याने बहुतांश खरेदी केंद्र बंद आहेत. त्यामुळे शासनाने मुदतवाढ न दिल्यास किमान १० हजारांवर शेतकरी सोयाबीन विक्रीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

यावर्षी पावसाने सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. शिवाय कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे सोयाबीनच्या सरासरी उत्पादकतेमध्ये कमी आलेली आहे. त्यातच बाजारात वर्षभर ४ हजार ८९२ रुपये क्विंटल हमीभावदेखील शेतकऱ्यांना मिळालेला नाही.

सध्या बाजारात सोयाबीनचे भाव ४ हजारांदरम्यान स्थिरावले असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

२० हजार नोंदणी, १० हजार शेतकऱ्यांची खरेदी

* नाफेड केंद्रांवर खरेदीसाठी मुदतीत १९ हजार ७५१ शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केलेली आहे. त्यातुलनेत आतापर्यंत ९ हजार ३५७ शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी यंत्रणांद्वारा करण्यात आलेली आहे.

* अद्याप नोंदणी केलेले १० हजार ३९४ शेतकरी बाकी असतांना १२ जानेवारीनंतर केंद्रांची मुदत संपणार आहे व आज रविवार असल्याने केंद्र बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांची अडवणूक करण्यात आलेली आहे.

नाफेड केंद्रांवर सोयाबीन खरेदीची १२ जानेवारीपर्यंत मुदत आहे. मुदतवाढ देण्याची शेतकऱ्यांची व लोकप्रतिनिधींची मागणी आहे. त्यामुळे मुदतवाढ मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. - अजय बिसणे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी

नाफेड केंद्रांची सद्यास्थिती

व्हीसीएमएफची केंद्र११
डीएमओची केंद्र०९
शेतकऱ्यांनी नोंदणी१९,७५१
खरेदी झालेले शेतकरी९३५७
खरेदी सोयाबीन१,९२,३२१ क्विं
खरेदी बाकी शेतकरी१०,३९४

हे ही वाचा सविस्तर : Soybean Market Update: विदर्भ-मराठवाड्यातील २८८ सोयाबीन केंद्रांवर शेतकऱ्यांचे वेटिंग

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड