Join us

मृग बहार मोसंबीला पाचोड बाजार समितीत सर्वोच्च दर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 10:34 AM

आत्तापर्यंतचा हा सर्वोच्च दर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाचोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोसंबी मार्केटमध्ये रविवारी मृग बहार मोसंबीला ४४ हजार रुपये प्रति टनचा दर मिळाला आहे. आत्तापर्यंतचा हा सर्वोच्च दर आहे.

पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीचे पाचोड येथील मोसंबी मार्केट प्रसिद्ध आहे. या मार्केटमध्ये दरवर्षी आंबा बहार व मृग बहारमधील मोसंबी विक्रीसाठी परिसरातील शेतकरी आणतात. या मार्केटमध्ये खरेदीसाठी मुंबई, तेलंगणा, कोलकाता, दिल्ली आदी ठिकाणांहून व्यापारी येतात. यावर्षी पाचोड परिसरात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने मोसंबीचे उत्पादन कमी आहे.

त्यामुळे बाजारात इतर वर्षांच्या तुलनेत यावर्षी मोसंबीची आवक कमीच आहे. रविवारी येथे झालेल्या लिलावात मृग बहार मोसंबीला ४४ हजार रुपये प्रति टन भाव मिळाला. रविवारी येथील बाजारात १०० ते १५० टन मोसंबी विकण्यासाठी शेतकऱ्यांनी आणली होती.

याबाबत व्यापारी शिवाजी भालसिंगे म्हणाले, मृग बहार मोसंबीसाठी मार्केट सुरू आहे. शेतकरी मोसंबी विक्रीसाठी पाचोडला आणतात. चांगल्या प्रतीच्या मृग बहार मोसंबीला रविवारी तब्बल ४४ हजार रुपये प्रति टन भाव मिळाला आहे.

आतापर्यंतचा सर्वोच्च दर

मागील वर्षी एप्रिल महिन्यात मृग बहार मोसंबीला सर्वोच्च २० ते २५ हजार रुपये प्रति टनचा भाव शेतकऱ्यांना मिळाला होता.

यावर्षीच्या मृग बहार मोसंबीला ४४ हजार रुपये प्रति टन दर मिळाल्याने या दराने गेल्या सर्व वर्षाचे रेकॉर्ड तुटले आहे. विशेष म्हणजे, आंबा बहार मोसंबीला आतापर्यंत ९० हजारांचा सर्वोच्च दर मिळाला आहे.

हेही वाचा - गोड चवीचा आणि पिकलेला आंबा आता ओळखा या सोप्या टिप्सने

टॅग्स :फळेशेतकरीशेतीबाजार