Join us

Market Yard: उदगीर मार्केट यार्ड बंद; काय आहे कारण जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 18:40 IST

Market Yard: उदगीर येथील मोंढ्यात बुधवारी (१२ फेब्रुवारी) रोजी पासून बंद करण्यात आला आहे. जाणून घ्या काय आहे कारण.

उदगीर येथील मोंढ्यात बुधवारी (१२ फेब्रुवारी) रोजी गुमास्ता व हमालांमध्ये झालेल्या वादामुळे दोन दिवसांपासून मार्केट यार्ड (Market Yard) बंद आहे. त्यातच शुक्रवारी (१४ फेब्रुवारी) रोजी बाजार समितीने मोंढ्यातील अडत व्यापाऱ्यांना मातेरे व जास्तीची हमाली दिल्यास कडक कारवाई करण्याची नोटीस दिली आहे.

परिणामी, हमालांनी काम बंद केल्याने दुसऱ्या दिवशी सौदा निघूनही खरेदी-विक्रीचे व्यवहार होऊ शकले नाहीत. त्यामुळे दोन दिवसांपासून माल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना रिकामे हाताने परत जावे लागले आहे.

सौद्याच्या वेळी बुधवारी गुमास्ता व हमाल यांच्यामध्ये वाद झाला. दारू पिऊन हाणामारी केल्याचा आरोप गुमास्तांनी संघटनेकडे केला. याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बाजार समितीकडे (Bajar Samiti) तक्रार घेऊन गेले असता तिथे योग्य तो प्रतिसाद न मिळाल्याने गुमास्तांनी हमालाच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यामुळे गुरुवारी सौदा निघाला नाही.

आता बाजार कधी सुरू होतो याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. गुरुवारी सकाळी मुनीम संघटनेचे पदाधिकारी बाजार समितीमध्ये त्या हमालाच्या विरोधात तक्रार करण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी योग्य तो प्रतिसाद न मिळाल्याने तो वाद शेवटी शहर पोलिस ठाण्यात पोहोचला आहे.

बाजार समितीने बजावल्या नोटिसा...

बाजार समितीने शुक्रवारी यार्डातील अडत व्यापाऱ्यांना हमालांना मातेरे दिल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला. ही बातमी दुकानावर काम करणाऱ्या हमालांना कळाल्यानंतर त्यांनी काम करणार नसल्याची भूमिका घेतली. त्यामुळे दोन दिवसांपासून मार्केट यार्ड बंद आहे.

सहायक उपनिबंधक बी. एस. नांदापूरकर म्हणाले, दोन दिवसांत दोन वेगवेगळ्या कारणामुळे मोंढा बंद राहिला आहे. शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घेऊन बाजार सुरू करण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याची सूचना केली आहे.

दोन दिवसांपासून सौदा नाही

२ दिवस बाजार बंद पडल्याने विक्रीसाठी माल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे.

कडक कारवाईचा इशारा

शुक्रवारी बाजार समितीने मोंढ्यातील अडत्यांना हमालास मातेरे व जास्तीची हमाली दिल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

यामुळे हमालांनी दुकानावर काम केले नसल्याने सौदा निघूनसुद्धा खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले नाहीत. बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे.

हे ही वाचा सविस्तर : Maize Bajar Bhav: मक्याच्या दरात चढ-उतार; काय आहे आजचा दर ते वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती