Market yard : शासनाकडून शेतमालाच्या किमान आधारभूत किमती (हमीभाव) निश्चित केलेल्या आहेत. असे असतानाही शासनाच्या नियंत्रणाखाली असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये(APMC) सोयाबीन, तूर, मूग, कपाशी या शेतमालाला हमीपेक्षा ही कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
शेतकऱ्यांच्या घरात शेतमाल(Agriculture Products) आला की, भाव कोसळतात याचा अनुभव दरवर्षी शेतकऱ्यांना येतो. यंदाही सोयाबीन, मूग, उडीद, कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना याचा अनुभव सुरुवातीलाच आला. २०२४ च्या खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे सोयाबीनचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते.
प्रशासनाकडून पंचनामे करून नुकसानभरपाई संदर्भात शासनाकडे अहवाल पाठविला. अद्यापही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यातच सोयाबीनला हमीभावापेक्षा ही ६०० ते ७०० रुपयांनी कमी म्हणजेच सरासरी ४ हजार १०० ते ४ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.
खासगी व्यापाऱ्यांकडून यापेक्षाही कमी दराने सोयाबीनची खरेदी होत आहे. मूग, उडीद व कपाशीला देखील हमीभाव(Guaranteed Price) मिळत नाही. नवीन तूर आता बाजारात येत आहे.
तुरीला ७ हजार ५५० रुपये हमीभाव आहे. असे असतानाही तुरीला सरासरी ७ हजार १०० ते ७ हजार २०० रुपये भाव मिळत आहे. शासनाकडून शेतमालाला हमीभाव मिळालेला असतानाही, बाजार समित्यांमध्ये शेतमालाला त्यापेक्षाही कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.
मुहूर्तावर सोयाबीनला मिळाला होता ५५५५ रुपये भाव
नवीन सोयाबीनला मुहूर्तावर प्रति क्विंटल ५ हजार ५५५ रुपये भाव मिळाला होता. आता कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सरासरी ४ हजार १०० ते ४ हजार २०० रुपये भाव असल्याने प्रती क्विंटल १ हजार ३०० ते १ हजार ४०० रुपयांचा तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.
शेतकरी काय सांगतात.....
लागवड खर्चावर आधारीत शेतमालाला भाव मिळणे अपेक्षित आहे. एकीकडे लागवड खर्चात भरमसाठ वाढ होत आहे, तर दुसरीकडे शेतमालाच्या किमतीत फारशी वाढ नसल्याने शेतकऱ्यांचे बजेट कोलमडून जात आहे. - महादेवराव सोळंके, शेतकरी, नागठाणा
बाजार समित्यांमध्ये सोयाबीन, तूर या शेतमालाला हमीभावापेक्षाही कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी शेती कशी करावी? हा चिंतन करायला लावणारा प्रश्न आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घ्यायला हव्या. - सुरेश खोरणे, शेतकरी, चिखली
कोणत्या पिकाला किती हमीभाव?
पीक | हमीभाव |
सोयाबीन | ४८९२ |
कापूस | ७१२१ |
तूर | ७५५० |
मूग | ८६८२ |
उडीद | ७४०० |
बाजार समितीत काय भाव?
पीक | सरासरी भाव |
सोयाबीन | ४१०० |
कापूस | ७००० |
तूर | ७२०० |
मूग | ६३०० |
उडीद | ६२०० |