विवेक चांदूरकर
अकोला : रब्बी हंगाम (Rabi season) संपला असून, बहुतांश शेतकऱ्यांनी हरभऱ्याची (Harbhara) काढणी केली आहे. मात्र, मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने अद्याप हमीभावात हरभरा खरेदीचे केंद्र सुरू करण्यात आली नाही.
तूर (tur) विक्री करण्याकरिता जिल्ह्यात ९,२५७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, आतापर्यंत केवळ २,२६३ शेतकऱ्यांच्या तुरीची खरेदी करण्यात आली आहे. हरभरा रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक आहे.
हरभऱ्याची (Harbhara) काढणी आटोपली असून, शेतकरी विक्री करीत आहेत. मात्र, अद्याप हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशन आणि व्हीसीएमएस यांसह विविध कंपन्यांच्या वतीने तुरीची हमीभावात खरेदी करण्यात येत आहे.
जिल्ह्यात ९ हजार २५७ शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली आहे. मात्र, आतापर्यंत फक्त २,३९४ शेतकऱ्यांची ३६,८९८ क्विंटल तुरीची (tur) खरेदी करण्यात आली आहे.
पैसे मिळण्यास उशीर
* हमीभावात शेतमालाची विक्री केली, तर पैसे मिळण्यास उशीर होतो. तसेच, अनेक अडचणी येतात. त्यामुळे शेतकरी दोन पैसे कमी मिळाले, तरी बाजारात शेतमाल विक्री करण्यावर भर देतात.
* तुरीला ७,५५० रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. सध्या तुरीला बाजारात ६,८५० ते ७,५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.
८ एप्रिलपर्यंत मिळाली मुदतवाढ
तुरीची ऑनलाइन नोंदणी २४ जानेवारीपासून सुरू करण्यात आली. त्याची मुदत २४ फेब्रुवारीला संपल्याने ३० दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर पुन्हा आता ८ एप्रिलपर्यंत नोंदणीसाठी मुदत देण्यात आली आहे.
सध्या जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशनचे तूर खरेदीचे १८ केंद्र सुरू आहेत. हरभऱ्याचे खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत अद्याप आदेश आले नाहीत. आदेश येताच हरभरा खरेदी सुरू करण्यात येणार आहे. - मारुती काकडे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, अकोला.
हे ही वाचा सविस्तर : Cotton Cultivation: पांढरे सोने शेतातच पडून; जाणून घ्या काय आहे कारण