Join us

Market Update: उदगिर बाजारात सोयाबीन, हरभऱ्याच्या दरामध्ये आली तेजी..! वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 11:41 IST

Market Update : बाजारात तब्बल सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मागील काही दिवसांपासून सोयाबीनचे (Soybean) दर वाढू लागले आहेत. त्यामुळे रब्बी हंगामातील हरभऱ्यातही (Harbhara) तेजी आली आहे.

विनायक चाकुरे

उदगीर (Udgir)  बाजारात तब्बल सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मागील काही दिवसांपासून सोयाबीनचे (Soybean) दर वाढू लागले आहेत. दिवाळी पाडव्यापासून दर वाढतील या अपेक्षेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना शेवटी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दर वाढल्याचे दिसून आले. (Market Update)

या दरम्यानच्या काळात अनेक शेतकऱ्यांनी दोन वर्षांपासूनचे सोयाबीन कवडीमोल दराने बाजारात विक्री केले. त्यातच आता रब्बी हंगामातील हरभऱ्याच्या(Harbhara) दरातही २०० रुपयांची तेजी आली आहे. मात्र तुरीचे दर स्थिर आहेत.(Market Update)

या भागातील शेतकऱ्याचे प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनला योग्य भाव मिळेल यासाठी शेतकऱ्यांनी मागील दोन वर्षापासून त्यांच्याकडील माल विक्रीविना साठवून ठेवला होता. परंतु हंगामाच्या सुरुवातीपासूनच सोयाबीनचे दर दबावातच राहिले होते. (Market Update)

दिवाळी पाडव्यादिवशी तरी दर वाढतील या अपेक्षेने शेतकरी माल विक्रीसाठी घेऊन आले होते. परंतु त्यांच्या पदरी निराशाच आली होती.

दिवाळीच्या सणाअगोदर सुरू झालेला हंगाम गुढीपाडव्याचा सण तोंडावर आला तरी सोयाबीनच्या दरात वाढ होत नव्हते. परंतु मागील चार दिवसांपासून सोयाबीनच्या दरात ३०० रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

यावर्षी सोयाबीनचा सर्वात जास्त साठा सरकारकडे....

या वर्षी राज्य सरकारने ४ हजार ८९२ रुपये प्रतिक्विंटल दराने सोयाबीनची हमीदराने खरेदी केली आहे. दर वाढतील या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी घरी ठेवलेले सोयाबीन मागील काही दिवसांत विक्री केले आहे.

साठा व्यावसायिकांमुळे हरभरा दरात तेजी...

* रब्बी हंगामातील हरभरा बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल, अशी व्यापाऱ्यांची व सरकारची अपेक्षा होती.

* सरकारने ५ हजार ६५० रुपये क्विंटल या हमीदराने हरभऱ्याची खरेदी करण्याची जाहीर केले. परंतु बाजारात हमीदरापेक्षा जास्तीचा दर मिळत असल्याने सरकारची हमीदर केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.

सोयाबीनच्या पेंडीला मागणी वाढली...

* मका व तांदूळ यापासून इथेनॉलनिर्मिती करण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे मका व तांदूळ यामधून इथेनॉलनिर्मितीनंतर शिल्लक राहणारी पेंड पोल्ट्री व्यावसायिक वापरत असत.

* मक्याची पेंड १४ रुपये तर तांदळाची पेंड ८ रुपये किलोने पोल्ट्री व्यावसायिकांना उपलब्ध होत होती. त्या तुलनेत ३५ रुपये किलोने मिळणारी सोयाबीन पोल्ट्री व्यावसायिकांना महाग मिळत होती.

* त्यामुळे सोयाबीनच्या पेंडीला मागणी कमी होते. परंतु अलीकडे मका व तांदळाच्या पेंडीच्या वापराने बर्ड फ्लूमुळे बळी जाणाऱ्या पक्ष्यांची संख्या वाढली आहे, असे पोल्ट्री व्यावसायिक सांगत आहेत. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिक सोयाबीन पेंडीचा वापर करीत असल्याने मागणी वाढली आहे, असे व्यापारी सांगत आहे.

* ३०० रुपयांची वाढ सोयाबीनच्या दरात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असल्याचे बाजारातील चित्र आहे.

आता शेतकऱ्याकडील सोयाबीनचा साठा संपत आला असून, सर्वात जास्त सोयाबीन सरकारकडेच शिल्लक आहे. या वर्षी सोयाबीनचा जास्त साठा शासनाकडे आहे. शासनाने ४, ८९२ रुपये प्रतिक्विंटल दराने सोयाबीनची खरेदी केली आहे. शासन अशात सोयाबीन विक्री करण्याच्या मनस्थितीत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात घडणाऱ्या घडामोडींचा सोयाबीनच्या दरावर परिणाम होतो. - अमोल राठी, सोयाबीन व्यापारी

हे ही वाचा सविस्तर : Cotton Market Update : पांढऱ्या सोन्याला मिळाली झळाळी; 'या' बाजारात मिळाला उच्चांकी दर वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनमूगहरभराबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड