Join us

मार्च एंड शेतकऱ्यांच्या मुळावर; शेतमालाला कवडीमोल मिळतोय दर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 3:36 PM

खुल्या बाजारात भाव पाडण्यात येत असून, शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. मार्च एंडच्या पार्श्वभूमीवर खरेदी विक्री बंद.

हिंगोली येथील बाजार समितीने होळी, धूलिवंदन आणि मार्च एंडच्या पार्श्वभूमीवर २२ मार्चपासून मोंढा व हळद मार्केट यार्डातील शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद ठेवले आहेत. २ एप्रिलपर्यंत व्यवहार बंद राहणार आहेत. दरम्यानच्या काळात मात्र शेतकऱ्यांनी माल विकायचा कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हिंगोली बाजार समितीचे संत नामदेव हळद मार्केट यार्ड मराठवाड्यासह विदर्भात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी हिंगोली, नांदेड, परभणी, वाशिम, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांतील शेतकरी हळद विक्रीसाठी आणतात. गत आठवड्यापासून शेतकऱ्यांकडे हळद उपलब्ध झाली आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना हळद विक्री करणे गरजेचे आहे. परंतु, २२ मार्चपासून होळी, धूलिवंदन आणि आता मार्च एंडच्या पार्श्वभूमीवर मार्केट यार्ड बंद असल्यामुळे खुल्या बाजारात हळद विक्री करण्याची वेळ येत आहे.

या बाजारात मात्र व्यापाऱ्यांनी मनमानी सुरू असून, पडत्या भावात हळदीची मागणी होत आहे. बाजार समितीच्या मार्केट यार्डात १६ ते १९ हजारांदरम्यान भाव मिळत होता. खुल्या बाजारात मात्र १२ ते १४ हजार रुपये क्विंटलने हळदीची खरेदी केली जात आहे. यातून शेतकऱ्यांची लूट होत असून, आर्थिक फटका बसत आहे.

परंतु, आर्थिक निकडीमुळे शेतकऱ्यांना खुल्या बाजारात हळद विक्री करावी लागत आहे. अशीच परिस्थिती हरभरा, तूर, गव्हाचीही असून, पडत्या भावात शेतमालाची मागणी होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बाजार समितीचा मोंढा, हळद मार्केट यार्ड सुरू होण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.

गटशेती फायद्याची; शेतकर्‍यांनी ३० एकरमध्ये मिळवलं ७३२ क्विंटल कापसाच उत्पादन 

हळद मार्केट यार्डात शुकशुकाट

बाजार समितीच्या संत नामदेव हळद मार्केट यार्ड शेतकरी, खरेदीदार, आडते, हमाल, मापाऱ्यांनी गजबजलेले असते. व्यवहार बंद असल्याने मात्र मार्केट यार्डात गुरुवारी शुकशुकाट होता. तर मार्केट यार्ड, मोंढा कधी सुरू होणार, अशी विचारणा करण्यासाठी शेतकरी दररोज रोज आहेत.

हरभरा, हळद उपलब्ध झाली आहे. परंतु, मोंढा, हळद मार्केट यार्डातील शेतमाल खरेदी विक्रीचे व्यवहार बंद असल्यामुळे खुल्या बाजारात माल विक्री करावा लागत आहे. या बाजारात पडत्या भावात मागणी होत असून, एक प्रकारे शेतकऱ्यांची लूट होत आहे. त्यामुळे बाजार समितीने मोंढा, हळद मार्केट यार्डातील व्यवहार लवकर सुरू करणे गरजेचे आहे. - प्रकाश जोजार, शेतकरी

गेल्या आठवड्यात बाजार समितीच्या मार्केट यार्डात हळदीला १९ हजारांपर्यंत भाव मिळाला. परंतु, सध्या तेथील व्यवहार बंद असल्यामुळे खुल्या बाजारात पडत्या भावात शेतमालाची विक्री करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे बाजार समितीने मोंढ्यातील व्यवहार लवकर सुरळीत करावेत. जेणे करून सध्या सुरू असलेली शेतकऱ्यांची लूट थांबेल. - शिवाजी साबळे, शेतकरी

मोंढ्यातील व्यवहार ३ एप्रिल रोजी होणार सुरळीत

बाजार समितीच्या वतीने होळी, धूलिवंदन आणि आता मार्च एंडच्या पार्श्वभूमीवर मोंढ्यातील भुसार शेतमालासह मार्केट यार्डात हळद खरेदी- विक्रीचे व्यवहार २२ मार्चपासून बंद ठेवण्यात आले आहेत. आता ३ एप्रिल रोजी व्यवहार सुरळीत होणार आहेत. या दिवशीपासून शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी आणता येणार आहे.

खुल्या बाजारात मनमानी

मोंढा, हळद मार्केट यार्ड बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना खुल्या बाजारात शेतमाल विक्री करावा लागत आहे. या संधीचा फायदा व्यापारी उचलत असून, पडत्या भावात शेतमालाची मागणी होत आहे. गेल्या आठवड्यात मार्केट यार्डात १६ ते १९ हजारांदरम्यान हळद विक्री झाली असताना खुल्या बाजारात मात्र १२ ते १४ हजार रुपयांवर हळदीला भाव मिळत नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :बाजारशेतकरीपीकशेतीमार्केट यार्डमार्केट यार्ड