Join us

Mango Export बारामतीचा आंबा पोहोचला लंडन, अमेरिकेच्या बाजारात, प्रति किलो असा मिळाला भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 11:43 AM

फळांचा राजा म्हणून ओळख असणाऱ्या महाराष्ट्रातल्या आंब्याची बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती आणि रेनबो इंटरनॅशनल एक्सपोर्टने आजपर्यंत ३५१ टन आंब्याची निर्यात केली (Mango export) आहे.

प्रशांत ननवरेबारामती : फळांचा राजा म्हणून ओळख असणाऱ्या महाराष्ट्रातल्या आंब्याची बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती आणि रेनबो इंटरनॅशनल एक्सपोर्टने आजपर्यंत ३५१ टन आंब्याची निर्यात केली आहे. कोकणातील देवगड हापूस, केशर यासारखे आंबे परदेशात अधिक लोकप्रिय आहेत.

यामध्ये आंध्रप्रदेश, तेलंगणातील हिमायत आंब्याची देखील आता भर पडली आहे. आतापर्यंत ३५१ टन आंबा विमानाने अमेरिका आणि इंग्लंडला पाठविण्यात आला आहे. दरवर्षी आंबा निर्यातीचा नवा पल्ला गाठत बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती निर्यातक्षम आंबा उत्पादकांचा आधार बनली आहे.

यंदा महाराष्ट्रातील कोकण रत्नागिरीचा देवगड हापूस, तर बारामतीसह परिसरातील केशर आणि आंध्रप्रदेश, तेलंगणाच्या हिमायत आंबे निर्यात होत आहेत. आंब्याच्या निर्यातीसाठी सर्वसाधारण २०० ग्रॅमपेक्षा अधिक वजनाचा, डाग नसलेला आंबा निवडला जात आहे.

लंडनसाठी निर्यात (mango export) केलेल्या फळांना गरम पाण्याची (हॉट वॉटर ट्रिटमेंट) प्रक्रिया केली जात आहे. त्यानंतर प्रीकूलिंग पॅकिंग करून निर्यात केली जात असल्याचे रेनबो एक्सपोर्टचे शंभुराजे रणवरे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

आंबा आकर्षक पद्धतीने पॅकिंग करून आकर्षक पद्धतीने निर्यात केला जात आहे. पॅकिंग केलेला आंबा एका दिवसात परदेशात हवाई मार्गे पोहोचतो. त्यानंतर पाच ते सहा दिवस आंबा विक्रीयोग्य राहतो. यंदा निर्यात केलेल्या आंब्यात कोकणातील हापूससह बारामतीच्या केशर आंब्याचा समावेश असल्याचे रणवरे यांनी सांगितले.

यंदा २२५ रुपये प्रतिकिलो भावमहाराष्ट्राच्या विविध भागांतून आयात केलेल्या आंब्यांची प्रतवारी करून स्थानिक बाजारपेठेत मागणीनुसार आंबे उपलब्ध करून दिले जात आहेत. त्यामुळे आंबा उत्पादकांना जादा भाव मिळत आहे. यंदा २२५ रुपये प्रतिकिलो बाजारभाव आंब्याला मिळत आहे.

कमी पाण्यावर येणाऱ्या आंबा पिकाची लागवड- आंबा हे पीक कोकणातच येऊ शकते, अशी पूर्वी धारणा होती. मात्र, आता आपल्याकडे आंबा सर्रास लावला जात आहे.सुरुवातीला वातावरण बदल, अवकाळी पाऊस आदी अडचणी आल्या. मात्र, आता शेतकऱ्यांना आंबा लागवडीचा अंदाज आला आहे.कमी पाण्यात आंबा चांगल्या पद्धतीने तग धरू शकतो, परदेशात हापूस बरोबर केशर आदी आंब्याची गोडी वाढू लागली आहे. परिणामी, मागणीदेखील वाढत आहे.शेतकऱ्यांनी ही संधी ओळखून कमी पाण्यावर येणाऱ्या आंबा पिकाची लागवड करावी, तसेच निर्यातीच्या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती सुनील पवार यांनी केले आहे.

अधिक वाचा: Jamun Cultivation बाजारात या फळाला मिळतोय चांगला बाजारभाव; कशी कराल लागवड

टॅग्स :आंबाशेतकरीशेतीफलोत्पादनबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीबारामतीइंग्लंड