Join us

Wheat, Bajari Rate : गव्हाच्या चपातीपेक्षा बाजरीची भाकरी झाली महाग, जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 20:41 IST

Wheat, Bajari Rate : हिवाळ्यातील उष्णतावर्धक धान्य म्हणून बाजरीची (Bajari Bhakari भाकरी खाण्याकडे आरोग्य जपणाऱ्यांचा कल वाढला आहे.

Wheat, Bajari Rate : हिवाळ्यातील उष्णतावर्धक धान्य म्हणून बाजरीची (Bajari Bhakari भाकरी खाण्याकडे आरोग्य जपणाऱ्यांचा कल वाढला आहे. वाढलेल्या मागणीनुसार बाजारात पुरवठा होत नसल्याने बाजरीचे दर वधारले आहेत. परिणामी गव्हाच्या चपातीपेक्षा बाजरीची भाकरी महागात पडत आहे.

बल्लारपूर तालुक्यात शेतकरी बाजरी पिकाला महत्त्व देत नाहीत. यामुळे बाजरी आणि ज्वारीचे दर (Jawari Rate) चार ते साडेचार हजारांवर पोहोचले, तर गव्हाचे दरही चांगलेच वधारले आहेत. तरीही चपातीपेक्षा बाजरीची भाकरी महाग असल्याचे चित्र आहे. हिवाळा सुरू झाल्यानंतर नागरिक उष्णतावर्धक खाद्यपदार्थांना प्राधान्य देतात. 

वाढलेली थंडी पाहता सुकामेवा, बाजरीची भाकरी अशा खाद्यपदार्थांचे सेवन केले जाते. त्यामुळे घरोघरी असो की हॉटेल, ढाबा अशा सर्व ठिकाणी बाजरीची भाकरी बनवली जाते. मागणी वाढल्याने व बाजरीचे दर वाढल्याने बाजरीची भाकर महाग झाली आहे. दोन महिन्यांत गव्हाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मध्यम दर्जाचा गहू लोकवण, शरबती ३६ ते ४० रुपयांवर पोहोचला आहे. तर बाजरीचे दर ४० ते ६५ रुपये प्रतिकिलो आहेत. बाजरी ही उष्ण असल्याने ती थंडीत आवर्जून खाल्ली जाते. 

बाजरीच्या भाकरीला मागणी वाढली

जेवणात एक वेळ बाजरीच्या भाकरीचा सामावेश होऊ लागला आहे. यामुळे मागणी वाढली आहे. बाजरीचे सेवन केल्याने शरीरातील अंतर्गत उष्णता टिकवून ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. ज्वारी आणि बाजरी मधुमेहाच्या रुग्णांसाठी व रक्तातील साखर कमी करण्यासाठी रामबाण समजली जाते. असे आहार तज्ज्ञांकडून सांगण्यात येते. बाजरीत मोठ्या प्रमाणात फायबर असल्याने योग्य पचन राखण्यास मदत होते. त्यामुळे हिवाळ्यात बाजरीची भाकर खाण्यास प्राधान्य दिले जाते.

कसे आहेत गहू, बाजरीचे बाजारभाव 

आज सर्वसाधारण बाजरीला अहिल्यानगर बाजारात 2800 रुपये, तर अमरावती बाजारात 2850 रुपये सरासरी दर मिळाला. नांदगाव बाजारात 8203 या बाजरीला 2350 रुपये, तर जालना बाजारात हिरव्या बाजरीला 2800 रुपये, तर अकोला बाजारात 1950 रुपये दर मिळाला. पुणे बाजारात महिको बाजरीला सर्वाधिक 3750 रुपये दर मिळाला. 

तर आज सर्वसाधारण गव्हाला अहिल्यानगर बाजारात 2700 रुपये तर कळम करमाळा बाजारात 25 रुपये दर मिळाला. तर 2189 गव्हाला लासलगाव बाजारात 3275 रुपये, वाशिम बाजारात 2700 रुपये तर भंडारा बाजारात 2700 रुपये दर मिळाला. बन्सी गव्हाला मुरूम बाजारात 3400 रुपये तर सोलापूर बाजारात शरबती गावाला 3700 रुपये, पुणे बाजारात 4500 रुपये, तर नागपूर बाजारात 3350 रुपये दर मिळाला.

टॅग्स :गहूशेती क्षेत्रमार्केट यार्डशेती