Join us
Daily Top 2Weekly Top 5

Tur Soybean Market : तूर, सोयाबीनच्या दरात उसळी; कारण काय? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 11:36 IST

Tur Soybean Market : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. यंदा सरासरी उत्पादनात घट झाल्याने तूर आणि सोयाबीनचे दर पहिल्यांदाच हमीभावाच्या वर गेले आहेत. नाफेडच्या एमएसपी (MSP) खरेदीमुळे दरांना आधार मिळत असून, बाजारात तूर ८,७०० तर सोयाबीन ५,४०० रुपयांच्या घरात पोहोचले आहे.(Tur Soybean Market)

Tur Soybean Market : यंदाच्या हंगामात सरासरी उत्पादनात घट झाल्याचा थेट परिणाम शेतमालाच्या बाजारभावांवर दिसून येत आहे. विशेषतः तूर आणि सोयाबीनचे दर पहिल्यांदाच हमीभावाच्या (MSP) वर गेले असून, शेतमालाला चांगली झळाळी मिळाली आहे.(Tur Soybean Market)

नाफेडमार्फत सुरू असलेल्या एमएसपी खरेदीमुळे दरांना आधार मिळाला असून, कापसाच्या दरातही वाढ झाल्याचे चित्र आहे. मात्र, ही दरवाढ हंगामाच्या उत्तरार्धात झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष फायदा मर्यादित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.(Tur Soybean Market)

तुरीला दोन वर्षांतील उच्चांकी दर

अमरावती बाजार समितीत यंदा तुरीची मर्यादित आवक होत असून, तुरीला ८ हजार ते ८ हजार ७५१ रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. हा गेल्या दोन वर्षांतील उच्चांकी दर मानला जात आहे. शासनाने यावर्षी तुरीसाठी ८ हजार रुपये हमीभाव जाहीर केला असून, नाफेडमार्फत खरेदीपूर्व नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्वभूमीवर तुरीच्या दरात वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

सोयाबीनला तीन वर्षांतील सर्वाधिक भाव

सोयाबीनच्या दरातही लक्षणीय वाढ झाली आहे. अमरावती बाजार समितीत ४ हजार ७३८ पोत्यांची आवक झाली असून, सोयाबीनला ५ हजार ते ५ हजार ४५१ रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.

गेल्या तीन वर्षांत मिळालेला हा सर्वाधिक दर ठरत आहे. यंदा शासनाने सोयाबीनसाठी ५ हजार ३२८ रुपये हमीभाव जाहीर केला असून, याच दराने एमएसपी खरेदी सुरू असतानाच बाजारात दरवाढ झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये हालचाल वाढली आहे.

'लेमन' तुरीच्या दरवाढीचा परिणाम

देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचाही तुरीच्या दरांवर परिणाम होत आहे. कर्नाटक राज्यात तुरीचे सरासरी उत्पादन घटल्याने आवक कमी झाली आहे. तसेच परदेशातही तुरीच्या उत्पादनात घट नोंदवली गेली आहे.

या पार्श्वभूमीवर आफ्रिकन देशांतून आयात होणाऱ्या लेमन तुरीचे दर वाढले असून, त्याचा थेट फायदा देशांतर्गत तुरीच्या बाजारभावांना झाल्याचे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले.

सोयाबीनला मागणी वाढण्यामागची कारणे

यंदाच्या खरीप हंगामात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने सोयाबीनच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. उत्पादन घटल्यामुळे सोयापेंडची मागणी वाढली असून, त्याचा थेट परिणाम सोयाबीनच्या दरवाढीवर दिसून येत आहे. मागणी आणि पुरवठ्यातील तफावतीमुळे बाजारात सोयाबीनला उठाव मिळाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

नव्या तुरीला उच्चांकी भाव

सध्या शेतकऱ्यांकडे साठवणुकीतील तूर जवळपास संपली आहे. त्यामुळे बाजारात येणारी तूर ही यंदाच्या हंगामातील आणि हलक्या प्रतवारीच्या जमिनीतील आहे.

अद्याप काळ्या जमिनीतील तूर बाजारात येण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. त्यातच तुरीची एकूण आवक कमी असल्याने नव्या तुरीला सध्या उच्चांकी भाव मिळत आहे.

पुढील काळात दर टिकतील का?

सध्या बाजारात तुरीची आवक कमी आहे. हंगाम पूर्णपणे सुरू झाल्यानंतर हे दर टिकून राहतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कर्नाटकातील उत्पादन घट आणि परदेशी तुरीच्या दरवाढीचा परिणाम सध्या दिसून येत आहे, असे बाजार तज्ज्ञांचे मत आहे.

सध्या दिसणारी दरवाढ शेतकऱ्यांसाठी दिलासादायक असली तरी ती उशिरा झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांना त्याचा अपेक्षित लाभ मिळेल का, हा प्रश्न मात्र कायम आहे.

हे ही वाचा सविस्तर :Soybean Bajar Bhav : सोयाबीनला पुन्हा तेजी; पिवळ्या जातीला इतक्या हजार रुपयांचा दर वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Tur and Soybean Prices Surge: Understanding the Reasons Behind the Spike

Web Summary : Reduced yields have pushed tur and soybean prices above MSP, benefiting farmers. Limited supply and international factors are driving the surge. While positive, the late timing might limit benefits for many farmers. Market experts are watching to see if prices will hold.
टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनतूरबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड