परभणी : खरीप हंगामातील तुरीचे बाजारभाव गडगडल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून, बाजारातील अस्थिरतेमुळे शेतीमालासाठी हमीभावाच्या आधारावर तूर विक्री करण्यासाठी जिल्ह्यातील १ हजार ९८८ शेतकऱ्यांनी 'नाफेड'कडे नोंदणी केली होती. (Tur Kharedi)
शासनाने १३ मेपर्यंत मुदतवाढ दिल्यानंतर 'नाफेड' (NAFED) मार्फत सुरू करण्यात आलेल्या खरेदीत ८१८ शेतकऱ्यांकडून १३ हजार ४८६ क्विंटल तुरीची खरेदी (Tur Kharedi) करण्यात आली.
शेतमालाच्या बाजारभावात सातत्याने चढ-उतार होत असल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. तुरीचा हंगाम सुरू होण्याआधी बाजारात भाव १० हजार ते १२ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले होते. मात्र, खरीप तुरीचा पुरवठा वाढल्यानंतर हेच भाव ५ हजार रुपयांपर्यंत घसरले. (Tur Kharedi)
यामुळे हमीभावाच्या आशेने शेतकऱ्यांनी 'नाफेड'च्या खरेदी केंद्रांकडे धाव घेतली. जिल्ह्यातील १८ खरेदी केंद्रांवर ७ हजार ५५० रुपयांच्या हमीभावाने तूर खरेदी केली जात होती. (Tur Kharedi)
या कालावधीत 'नाफेड'ने १ हजार ९५६ शेतकऱ्यांना तूर विक्रीसाठी एसएमएस पाठवले होते. मात्र, प्रत्यक्षात ८१८ शेतकऱ्यांनी तूर विक्री केली.
खासगी बाजारपेठांमधील गोंधळ
* तूर, कापूस, सोयाबीन यांसारख्या शेतीमालाचे दर शेतकऱ्यांकडे माल नसताना वाढतात. शेतकरी माल घेऊन बाजारात उतरल्यावर दर तळाला जातात, ही जुनीच व्यथा आहे.
* अलीकडील काळात बाजारपेठेतील अस्थिरता वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही भरून निघत नाही.
पेडगाव, सेलू, रुढी पाटी येथेही सर्वाधिक प्रतिसाद
* जिंतूर तालुक्यातील बोरी खरेदी केंद्र हे सर्वाधिक विक्रीचे ठिकाण ठरले. या केंद्रावर एकूण ३०९ शेतकऱ्यांनी ५,०९० क्विंटल तूर विकली.
* त्याखालोखाल पेडगाव केंद्रावर १९५ शेतकऱ्यांनी ३ हजार ६२ क्विंटल,
* सेलू केंद्रावर ५७ शेतकऱ्यांनी ८०७ क्विंटल आणि रूढी पाटी केंद्रावर १२२ शेतकऱ्यांनी २८३१ क्विंटल तूर विक्री केली.
* एरंडेश्वर ३ शेतकरी २३ क्विंटल, ताडकळस ४० शेतकरी ५७० क्विंटल, तर भोगाव केंद्रांवर ४८ शेतकऱ्यांनी ६९३ क्विंटल तूर विक्री केली.
एरव्ही बाजारात मिळाला १० हजारांचा भाव
एरव्ही बाजारात मिळाला १० हजारांचा भाव असतो. परंतु, यंदा खासगी व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे शेतकऱ्यांना आपली तूर नाफेडकडे ७ हजार ५५० रुपयांच्या दराने विक्री करावी लागली.
तालुकानिहाय नाफेड तूर खरेदी
खरेदी केंद्र | शेतकरी संख्या | खरेदी (क्विंटल) |
---|---|---|
बोरी | ३०९ | ५,०९० |
पेडगाव | १९५ | ३,०६२ |
रूढी पाटी | १२२ | २,८३१ |
सेलू | ५७ | ८०७ |
ताडकळस | ४० | ५७० |
भोगाव | ४८ | ६९३ |
एरंडेश्वर | ३ | २३ |
इतर केंद्रे (जिंतूर, पाथरी, इ.) | ४४ (एकत्र) | ४१० |
एकूण | ८१८ | १३,४८६ |