Join us
Daily Top 2Weekly Top 5

Soybean Market : सोयाबीन दरवाढीचा फायदा कुणाला? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 18:36 IST

Soybean Market : राज्यात सोयाबीनच्या दरात ३०० रुपयांची वाढ झाली आहे. मात्र हमीभाव जाहीर होऊनही ९८ टक्के शेतकऱ्यांना शासकीय खरेदीचा लाभ मिळालेला नाही. आवक घटली, मागणी वाढली आणि दरवाढीचे गणित बदलले आहे. (Soybean Market)

जब्बार चिनी गेल्या वर्षीच्या दिवाळीपासून महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकरी दरवाढीच्या प्रतीक्षेत होते. मात्र अपेक्षेप्रमाणे भाव न वाढल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी गरजेपोटी कमी दरातच सोयाबीनची विक्री केली. (Soybean Market)

आता बाजारात सोयाबीनचे दर प्रतिक्विंटल ३०० रुपयांनी वाढून ४ हजार ४०० वरून थेट ४ हजार ७०० ते ४ हजार ७५० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. मात्र, या भाववाढीचा लाभ शेतकऱ्यांऐवजी व्यापारी व साठेबाजांनाच अधिक मिळत असल्याचे वास्तव समोर आले आहे.(Soybean Market)

हमीभाव जाहीर, पण शेतकऱ्यांना लाभ नाही

मागील हंगामात सरकारने सोयाबीनसाठी ४ हजार ८९२ रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला होता. मात्र प्रत्यक्ष बाजारात त्या दराने खरेदी झाली नाही.

यंदा सरकारने तब्बल ४३६ रुपयांची वाढ करत ५ हजार ३२८ रुपये प्रतिक्विंटल किमान आधारभूत किंमत निश्चित केली आहे.

१५ नोव्हेंबर २०२५ पासून नाफेडमार्फत शासकीय खरेदी सुरू झाली असली, तरी विविध अटी, ऑनलाइन नोंदणी, गुणवत्ता निकष आणि केंद्रांची मर्यादा यामुळे सुमारे ९८ टक्के शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ मिळू शकलेला नाही.

दरवाढ सुरू, पण आवक घटली

मागील महिन्याच्या अखेरपर्यंत सोयाबीनचे सरासरी कमाल दर ४ हजार ३०० ते ४ हजार ४०० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान होते. मात्र, गेल्या काही दिवसांत बाजारात तेजी दिसून येत असून सध्या कमाल सरासरी दर ४ हजार ७५० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. विशेष म्हणजे, दर वाढत असतानाही बाजार समित्यांमधील आवक मात्र सातत्याने घटत आहे.

सोयाबीनची आवक (क्विंटलमध्ये)

२३ डिसेंबर : ५५२

२९ डिसेंबर : ५००

३० डिसेंबर : ४९०

३१ डिसेंबर : ४१९

१ जानेवारी : २६२

२ जानेवारी : ३५४

या आकडेवारीवरून दरवाढ असूनही शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी माल कमी असल्याचे स्पष्ट होते.

प्रक्रिया उद्योगांची मागणी वाढली

सध्या सोयाबीन प्रक्रिया उद्योगांकडून मागणीत वाढ झाली आहे. विशेषतः डीओसी (सोयाबीन पेंड) ची मागणी वाढल्याने बाजारात भावाला आधार मिळत आहे.

सध्या सोयापेंडचे दर ३६ ते ३८ हजार रुपये प्रति टन इतके असून, सोया तेलाचे दरही तुलनेने स्थिर आहेत. प्रक्रिया उद्योगांचे खरेदी दर ४ हजार ९०० ते ५ हजार १०० रुपये प्रतिक्विंटलच्या घरात असल्याचेही व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

पुढे काय?

बाजारातील आवक कमी, उद्योगांची वाढती मागणी आणि सोयापेंडला मिळणारा आधार पाहता सोयाबीनच्या दरात पुढील काळात आणखी थोडीफार वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, साठवणुकीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे पुरेसा माल नसल्याने सध्याची दरवाढ ही प्रामुख्याने व्यापारी वर्गालाच पोषक ठरत असल्याची खंत शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

हे ही वाचा सविस्तर : Soybean Procurement Payment : शेतकऱ्यांना दिलासा! नाफेडकडून सोयाबीन चुकारे खात्यात जमा वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Soybean Price Rise: Who Benefits? Detailed Analysis

Web Summary : Soybean prices rose, but traders, not farmers, are profiting. Despite government support prices, most farmers can't access them. Increased demand from processing industries may further increase prices, but benefits mainly go to traders due to limited farmer stock.
टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती