Join us
Daily Top 2Weekly Top 5

Soybean Market Update : दरातील घसरण थांबणार कधी? सोयाबीन बाजाराची स्थिती जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 12:07 IST

Soybean Market Update : सोयाबीनच्या दरातील तेजी अचानक थांबली असून बाजारात घसरणीची चिन्हे दिसू लागली आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम येथे काही दिवसांपूर्वी हमीभावाच्या पुढे गेलेले दर आता तब्बल ६०० रुपयांनी घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. आवक वाढ, सरकारी धोरण आणि बाजारातील स्थिती यावर पुढील दिशा ठरणार असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.

Soybean Market Update : मागील काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरातील घसरणीचा सिलसिला सुरूच आहे. सोमवारी (२३ फेब्रुवारी) रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम येथे सोयाबीनला प्रती क्विंटल ४,७३० ते ५,१५० रुपये दर मिळाला. काही दिवसांपूर्वी हमीभावाच्या पुढे गेलेले दर आता घसरल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

सोयाबीन बेल्टमध्ये चिंतेचं वातावरण

वाशिम जिल्हा हा राज्यातील प्रमुख सोयाबीन पट्टा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात सरासरी सुमारे ३ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली जाते. 

२०२५ च्या खरीप हंगामात नवीन सोयाबीन बाजारात दाखल झाल्यानंतर सुरुवातीला दर चार हजार रुपयांच्या आसपास होते. जवळपास तीन महिने दर नियंत्रणात राहिले.

१५ जानेवारीनंतर मात्र बाजारात तेजी आली आणि दरांनी हमीभावाचा टप्पाही ओलांडला. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. दरवाढीमुळे बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आवक वाढली. मात्र आवक वाढताच दरात पुन्हा घसरण सुरू झाली.

क्विंटलमागे ६०० रुपयांची घसरण

गेल्या काही दिवसांत सोयाबीनच्या दरात साधारणपणे प्रती क्विंटल ६०० रुपयांची घट झाल्याचे चित्र आहे. तेजीच्या काळात विक्री थांबवून दर आणखी वाढतील, या अपेक्षेने थांबलेल्या शेतकऱ्यांना आता तोटा सहन करावा लागत आहे.

मागणी स्थिर; तरीही दर का घसरले?

बाजार तज्ज्ञांच्या मते, सध्या सोयाबीनची मागणी पूर्णपणे कमी झालेली नाही. सोयापेंड आणि खाद्यतेलाच्या दरातही फारशी घसरण झालेली नाही. मात्र, बाजारातील आवक वाढ, निर्यात धोरण, तसेच सरकारी खरेदी व साठा धोरण यावर दर अवलंबून असतात.

सोयाबीनचे दर आता सरकारच्या धोरणावर अवलंबून आहेत. धोरणानुसार पुढील काळात दरात चढ-उतार होऊ शकतात.- आनंद चरखा, खासगी बाजार संचालक

दरातील घसरण थांबणार कधी?

दरातील सध्याची घसरण तात्पुरती असल्याचा अंदाज काही बाजार तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. आवक कमी झाल्यास आणि सरकारी हस्तक्षेप झाल्यास सोयाबीनमध्ये पुन्हा तेजी येऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

मात्र, तोपर्यंत शेतकऱ्यांनी बाजारातील स्थितीचा अंदाज घेऊन विक्रीचा निर्णय घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

सध्या सोयाबीन पट्ट्यात दरातील चढ-उतारामुळे अनिश्चिततेचे वातावरण असून, पुढील काही दिवस बाजारासाठी निर्णायक ठरणार आहेत.

हे ही वाचा सविस्तर : Soybean Bajar Bhav : सोयाबीनमध्ये घसरण की तेजी? पिवळ्या मालाला जोरदार उठाव वाचा सविस्तर

अधिक वाचा : Shetmal BajarBhav : तूर-हरभऱ्यात मंदी; साखर बाजारात नवा ट्विस्ट वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Soybean Market: When Will Prices Stop Falling? Market Analysis

Web Summary : Soybean prices are falling, causing concern among farmers in the Washim district. After a period of rising above the support price, prices have declined by ₹600 per quintal. Experts suggest the decline is temporary and prices may rise again with reduced supply and government intervention.
टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीबाजार समिती वाशिममार्केट यार्डमार्केट यार्ड