Join us
Daily Top 2Weekly Top 5

63 दिवसांत 18.18 लाख टन साेयाबीन खरेदी होईल का? मागील वर्षीसारखं करू नका!

By सुनील चरपे | Updated: December 12, 2025 12:35 IST

Soyabean Kharedi : सरकार चालू हंगामात १९ लाख टन साेयाबीन एमएसपी दराने खरेदी करणार असल्याची माहिती सभागृहाला दिली.

- सुनील चरपेनागपूर : पणनमंत्री जयकुमार रावल यांनी सरकार चालू हंगामात १९ लाख टन साेयाबीन एमएसपी दराने खरेदी करणार असल्याची माहिती सभागृहाला दिली. विशेष म्हणजे, नाफेड व एनसीसीएफ या संस्थांनी राज्यात २७ दिवसांमध्ये केवळ ८१ हजार ७८८.२८२ टन साेयाबीन खरेदी केले आहे. 

या दाेन्ही संस्थांना उर्वरित ६३ दिवसांमध्ये १८ लाख १८ हजार २११.७१८ टन साेयाबीन खरेदी करायचे आहे. खरेदीचा वेग, नाेंदणी प्रक्रियेतील क्लिष्टता, बारदान्याची उपलब्धता आणि तांत्रिक बाबी विचारात घेता, सरकारच्या साेयाबीन खरेदी उद्दिष्टावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सरकारने १५ नाेव्हेंबरपासून एमएसपी दराने साेयाबीन खरेदीला सुरुवात केली असून, नाेंदणीची अंतिम तारीख ३१ डिसेंबर जाहीर केली आहे. नाफेड व एनसीसीएफला ही खरेदी ९० दिवसांत १२ फेब्रुवारी २०२६ पर्यंत पूर्ण करायची आहे. यासाठी नाफेडने २० जिल्ह्यांत ३५५ खरेदी केंद्रे प्रस्तावित केली असून, १८९ खरेदी केंद्रांना मंजुरी देत १६९ केंद्रांवर खरेदी सुरू केली आहे. 

या १६९ केंद्रांवर १,५६,७१९ शेतकऱ्यांची नाेंदणी करण्यात आली असून, गुरुवारपर्यंत १५,८२२ शेतकऱ्यांकडील ३७,८८४.०४१ टन साेयाबीन खरेदी केले आहे. एनसीसीएफने राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये ४२७ खरेदी केंद्रे प्रस्तावित केली आहेत. यातील २२२ केंद्रांना मंजुरी दिली असली तरी २०१ खरेदी केंद्र सुरू केले आहेत. या २०१ केंद्रांवर एकूण १,५९,८९७ शेतकऱ्यांची नाेंदणी करण्यात आली आहे. यापैकी १५,८२२ शेतकऱ्यांकडील ४३,९०४.२४१ टन साेयाबीन खरेदी केली आहे.

२.८२ लाख नाेंदणीकृत शेतकरी शिल्लकनाफेड व एनसीसीएफला ६३ दिवसांमध्ये त्यांच्या उर्वरित २ लाख ८१ हजार ९१६ शेतकऱ्यांकडील साेयाबीन खरेदी करायचे आहे. यात नाफेडच्या १ लाख ४० हजार ८९७ आणि एनसीसीएफच्या १ लाख ४१ हजार १९ शेतकऱ्यांचा समावेश आहे. खरेदीचा वेग व शेतकऱ्यांचा प्रतिसाद पाहता या शेतकऱ्यांकडून दाेन्ही संस्था उर्वरित काळात १८,१८,२११.७१८ टन साेयाबीन खरेदी करेल, याबाबत जाणकारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

मागील हंगामातील अनुभवसन २०२४ च्या हंगामात राज्य सरकारने शेतकऱ्यांकडील १३ लाख टन साेयाबीन खरेदी करण्याची घाेषणा केली हाेती. नाफेड व एनसीसीएफने २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत ५ लाख ११ हजार ६५७ शेतकऱ्यांकडून ११,२१,३८४.९१ टन साेयाबीन खरेदी केले हाेते. साेयाबीन खरेदीचा आकडा उद्दिष्टापेक्षा १,७८,६१५.०९ टनाने कमी असून, अनेक नाेंदणीकृत शेतकऱ्यांकडील साेयाबीनची खरेदी केली नव्हती.

English
हिंदी सारांश
Web Title : Soybean procurement target in doubt: Will 1.8 million tonnes be purchased?

Web Summary : Doubts arise about achieving soybean procurement targets. Despite government assurances, slow purchasing, logistical hurdles, and past failures raise concerns about buying 1.8 million tonnes within the deadline, leaving farmers potentially stranded.
टॅग्स :सोयाबीनमार्केट यार्डशेती क्षेत्रशेती