Join us

Shetmal Bajar Bhav : नवीन हंगामापूर्वी बाजारात शेतमाल आवक वाढली; तिळाला मिळाले उच्चांकी भाव वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 15:08 IST

Shetmal Bajar Bhav : अतिवृष्टी व घसरत्या बाजारभावांच्या दुहेरी फटक्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. पुढील काही दिवसांत नवीन हंगाम सुरू होणार असल्याने दर आणखी कमी होण्याच्या भीतीने शेतकऱ्यांनी साठवलेला शेतमाल विक्रीसाठी काढला आहे.

अतिवृष्टीमुळे खरिप पिकांचे मोठे नुकसान झाले असतानाच खुल्या बाजारात शेतमालाचे दर सतत घसरत आहेत. यंदा नेहमीप्रमाणे नवीन हंगाम सुरू होण्याआधी दर वाढण्याऐवजी घट होत आहे. (Shetmal Bajar Bhav)

गुरुवारी यवतमाळ येथील चिंतामणी खासगी बाजार समितीत तब्बल २ हजार क्विंटल तूर, सोयाबीन, तीळ, गहू, चणे आदींची आवक वाढताना दिसली.  (Shetmal Bajar Bhav)

पुढील काही दिवसांत तूर, सोयाबीन, तीळ यांचा नवीन माल बाजारात येणार असल्याने दर आणखी कमी होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे शेतमाल साठवून ठेवलेले उत्पादकही विक्रीसाठी धावत आहेत.(Shetmal Bajar Bhav)

गुरुवारी यवतमाळ-दारव्हा मार्गावरील चिंतामणी खासगी बाजार समितीत तब्बल २ हजार क्विंटल शेतमालाची आवक झाली. बाजार हाऊसफुल झाला होता. सर्वाधिक आवक तुरीची (सुमारे १,५०० क्विंटल) राहिली, तर ३०० क्विंटल सोयाबीन, तसेच तीळ, चणे आणि गहू विक्रीसाठी आले.(Shetmal Bajar Bhav)

तुरीच्या दरात घट

जून ते ऑगस्टदरम्यान तुरीला नेहमी जास्त दर मिळतात, पण यावर्षी ८ हजार रुपये क्विंटलपर्यंत गेलेले दर घटून आता ५ हजार ८०० ते ६ हजार ३७० क्विंटल इतके राहिले आहेत. पावसामुळे तुरीचा रंग बदलत असल्याने आणि दर पडत असल्याने शेतकऱ्यांनी साठवलेला माल विक्रीसाठी सोडला.

सोयाबीनचे भाव कोसळले

मागील वर्षीच्या हंगामातील सोयाबीन अजूनही शेतकऱ्यांकडे साठा स्वरूपात आहे. “कधी दर वाढतील” या अपेक्षेने थांबलेले शेतकरी आता तोटा टाळण्यासाठी विक्रीकडे वळले आहेत. ६ हजार रुपये क्विंटलवर पोहोचलेले भाव आता फक्त ४ हजार ३०० क्विंटलवर आले आहेत.

तिळाला दिलासा, मिळाले उच्चांकी भाव

दर घसरत असलेल्या तिळाला यवतमाळच्या खासगी बाजारात गुरुवारी ८ हजार ५०० ते ९ हजार ४०० क्विंटल दर मिळाले. इतर धान्यांच्या तुलनेत तीळ पिकाला अजूनही चांगले भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर तीळ विक्रीसाठी आणला.

शेतकऱ्यांची वाढती चिंता

शेतकऱ्यांचा साठवलेला माल बाजारात येऊ लागल्याने विक्रीसाठीची स्पर्धा तीव्र झाली आहे. दर आणखी घसरू नयेत, म्हणून उत्पादकांनी वेळीच शेतमाल विकण्याचा निर्णय घेतल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. पावसामुळे आधीच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांपुढे योग्य दर मिळवण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

हे ही वाचा सविस्तर : Halad Market : मार्केट यार्डात व्यापाऱ्यांच्याच थप्या; शेतकरी मात्र रांगेतच वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनतुरातूरशेतकरीशेती