Join us

Santra Kharedi : संत्र्याच्या विक्रमी खरेदीला प्रारंभ, सप्टेंबरपर्यंत 'इतका' भाव मिळण्याची शक्यता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 15:40 IST

Santra Kharedi : सुरवातीच्या काळात बाजारपेठेत आवक कमी राहून भावांमध्ये आणखी तेजी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Santra Kharedi :  यंदाच्या चालू हंगामात २५ ते ३० टक्क्यांच्या मर्यादेत आंबिया बहराची (Ambiya Bahar) फळे शिल्लक राहलेली आहे. सुरवातीच्या काळात काढलेली अल्प प्रमाणातील फूट,अतिउष्णतेमुळे झालेली संत्रा फळगळ, पावसाळ्यात झालेली बुरशीजन्य पिवळी होऊन गळलेली फळे यांमुळे आंबिया बहराच्या संत्रा फळांना प्रतिहजार ४ ते ५००० रुपये विक्रमी भाव मिळण्याची शक्यता आहे.

उचप्रतिच्या दर्जेदार बागांना खरेदी (santra Kharedi) करण्यासाठी व्यापाऱ्यांमध्ये चांगलीच ओढ लागल्याची चिन्हे दिसण्यास सुरवात झालेली आहे. चांदुर बाजार तालुक्यातील शिरसगाव कसबा येथे अमरावती, वरुड, मोर्शी, अचलपूर येथीलच नाही तर सौंसर (मध्यप्रदेश), गाझियाबाद (उत्तरप्रदेश), राजस्थान येथील व्यापाऱ्यांना संत्रा बागा खरेदी करण्याची ओढ लागण्यास सुरवात झाली आहे. या दराने खरेदी होत असल्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

संपूर्ण संत्रा पट्ट्यात १/३ संत्र्याचे प्रमाण असल्याने वाढत्या भावांचा फायदा हा फार काही शेतकऱ्यांना होत नसल्याचे बोलले जात आहे. या वर्षी संत्रा बागांवर फुलधारणा तर झाली परंतु त्याचे रूपांतर फळांत झाले नाही, तसेच जानेवारी महिन्यात नवती व फुलधारनेच्या क्रियेमध्ये सिट्रससायला रोगाने झाडांचे शेंडे वाळवून टाकले; परिणामी झाडांवर फुटीच्या तुलनेत फळे कमी आहेत असे अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

सुरवातीच्या काळात बाजारपेठेत आवक कमी राहून भावांमध्ये आणखी तेजी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यंदा मृग बहरातील संत्र्याचे दर ५५ हजार रुपये टनावर पोहोचले होते. सप्टेंबरमध्ये बाजारात उच्चप्रतिच्या फळांना ६० रुपये प्रतिकिलो दर मिळण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तविला आहे.

फक्त २५ ते ३० टक्के संत्रा उत्पादकांना चढ्या दरांचा फायदा 

अमरावती जिल्ह्यात संत्रा पीक ८२ हजार ३७८ हे.क्षेत्राखाली आहे. यापैकी आंबिया बहार अंदाजे ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर घेतला जातो. फेब्रुवारी-मार्च आंबिया बहराकरिता फुटीनंतर फळे सेट होण्याचा काळ असून यावर्षी याच वेळेत तापमानाने चाळीशी गाठली. त्यांचा थेट परिणाम फूट- फळगळीवर झाल्याने सद्यस्थितीत एकूण २५ ते ३० टक्के संत्रा शिल्लक असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

विमा ट्रिगर कालावधी वाढविण्याची मागणी पुनर्रचीत हवामान आधारित फळ पिक विमा योजनेत अवेळी पाऊस,कमी-जास्त तापमान,गारपीट विमा सिमित न ठेवता ऑक्टोबर महिन्यापर्यंत वाढविण्यात शेतकऱ्यांचे हित आहे.संत्रा हे वार्षिक पीक असल्याने विमा कवच हे संपूर्ण वर्षभर असायला पाहिजे.वेगांच्या वाऱ्यांमुळे संत्र्याचे नुकसान होत असल्याने याचा समावेश विमा योजनेत करण्यात यावा .- पुष्पक श्रीरामजी खापरे, जिल्हास्तरीय फळ पिक विमा शेतकरी प्रतिनिधी, अमरावती 

गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत यंदा  आंबिया बहार संत्रा २० ते २५ टक्केच शिल्लक राहिलेला आहे.त्या कारणाने चांगल्या फळांना सरासरी ४० हजार रुपये दर शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे.तसेच मे महिन्यातील अवकाळी पावसामुळे मृग बहार संत्रा बागांना फटका बसल्याने शेतकऱ्यांचे अर्थचक्र विस्कळीत झाले आहे.- श्रीधर ठाकरे, संचालक, महाऑरेंज

टॅग्स :शेती क्षेत्रमार्केट यार्डफलोत्पादनअमरावती