Join us

Reshim Market : बीडच्या रेशीम बाजाराचा देशात झेंडा; विक्रमी रेशीम कोष खरेदी वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 10:29 IST

Reshim Market : बीडच्या रेशीम कोष बाजारपेठेने विक्रमी कामगिरी केली आहे. केवळ १२ दिवसांत तब्बल ७ कोटींची खरेदी होऊन बीडने देशात दुसरे स्थान मिळवले आहे. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा आणि चांगल्या दरामुळे आवक वाढत आहे. (Reshim Market)

अनिल भंडारी

बीड येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीतील लोकनेते स्व. विनायकराव मेटे रेशीम कोष खरेदी-विक्री बाजारपेठेत विक्रमी आवक होत आहे. (Reshim Market)

१ ते १२ ऑगस्टदरम्यान तब्बल १ लाख २९ हजार ३३८ किलो रेशीम कोष बाजारात आले असून, ७ कोटी १३ लाख ७० हजार ८३५ रुपयांची खरेदी झाली आहे. विशेष म्हणजे देशभरात बीडची बाजारपेठ आता रामनगरनंतर दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे.(Reshim Market)

शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या सुविधा

रेशीम विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना राहण्याची, जेवणाची, पिण्याच्या पाण्याची सोय तसेच मोबदला ३ ते ५ दिवसांत मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे. यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात या बाजारपेठेकडे वळत आहेत. १ ते १२ ऑगस्ट दरम्यान १ हजार २०० शेतकऱ्यांकडून आवक नोंदवली गेली.(Reshim Market)

बाजारपेठेचा लौकिक वाढतोय

बीड जिल्ह्यासह नाशिक, पालघर, पुणे, लातूर, परभणी, नांदेड, धाराशिव, संभाजीनगर, जालना, अमरावती, यवतमाळ, भंडारा अशा अनेक जिल्ह्यांतून शेतकरी बीडला येत आहेत. खरेदीदार मात्र पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि विदर्भातून येत असून बीड बाजारपेठेला राष्ट्रीय ओळख मिळत आहे.

रामनगर नं. १; बीड नं. २

कर्नाटकातील रामनगर येथील बाजारपेठ देशातील अव्वल मानली जाते. तथापि, कमी अंतर, तुलनेने चांगला दर (रामनगरनंतर सर्वाधिक) आणि जलद पेमेंट सुविधांमुळे बीडची बाजारपेठ महाराष्ट्रात अव्वल, तर देशात दुसऱ्या क्रमांकावर ठरली आहे.

चालू आठवड्यातील आवक

१६ ऑगस्ट : ८ हजार ९१० किलो ५०० ग्रॅम

१८ ऑगस्ट : १५ हजार २२४ किलो ८०० ग्रॅम

१९ ऑगस्ट : ११ हजार ५२६ किलो ३५० ग्रॅम

२० ऑगस्ट : ८ हजार ३७० किलो १०० ग्रॅम

जुलै ते ऑगस्टदरम्यान सरासरी भाव ५५० ते ६०० रुपये प्रति किलो इतका मिळाला.

बीडची रेशीम कोष बाजारपेठ आता शेतकऱ्यांसाठी विश्वासार्ह आणि फायदेशीर ठरत असून, राष्ट्रीय पातळीवर लौकिक मिळवत आहे. दर, सुविधा आणि जलद पेमेंट यामुळे बीडला रामनगरनंतर देशातील दुसरा क्रमांक मिळाला आहे.

हे ही वाचा सविस्तर : Reshim Market : रेशीम कोष विक्रीत बीडचा डंका; एका आठवड्यात कोट्यवधींची उलाढाल वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रबीडरेशीमशेतीबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती