Join us

Onion Issue : पाकिस्तानचे कांदा निर्यात शुल्क निम्म्यावर, आंतरराष्ट्रीय बाजारात काय चाललंय? 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 1:13 PM

कांद्याच्या विदेशी बाजारपेठेत भारतासोबत स्पर्धा करता यावी, यासाठी पाकिस्तानने हा निर्णय घेतला आहे.

नाशिक : भारतातून कांदा निर्यातबंदी हटताच त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रकर्षाने जाणवत असून, पाकिस्तानने गुरुवारपासून किमान निर्यात शुल्क ७५० डॉलरवरून थेट ३५० प्रति टन केले. कांद्याच्या विदेशी बाजारपेठेत भारतासोबत स्पर्धा करता यावी, यासाठी पाकिस्तानने हा निर्णय घेतला असल्याची माहिती कांदा निर्यातदारांनी दिली.

सहा महिन्यांपासून भारतातून कांदा निर्यातबंदी लादल्याने बांगलादेशसह मलेशिया, श्रीलंका आदी देशांतील बाजारपेठेत चीन व पाकिस्तानने आपले स्थान भक्कम केले होते. मात्र, यामुळे भारतातील कांदा उत्पादकांची विदेशी बाजारपेठेतील पकड सैल झाली होती. भारताने कांदा निर्यातबंदी केल्याने याचा फायदा घेत पाकिस्तानने निर्यात शुल्क वाढवले होते. त्यामुळे पाकिस्तान मालामाल झाला होता. मात्र, भारतातून मंगळवारपासून कांद्याची विदेशवारी सुरू होताच पाकिस्तानने निर्यात शुल्क निम्म्यावर केले असल्याची माहिती मिळाली. 

भारतातून २०२२-२३ या वर्षात २५ लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली होती. त्यामुळे भारत चीननंतर सर्वांत मोठा कांदा उत्पादक देश बनला. मात्र, भारतातील निर्यातबंदीमुळे चीननंतर पाकिस्तानच्या कांद्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान भक्कम करण्याचा प्रयत्न केला. त्यात काहीसे यशही आले. परंतु, आता भारतातून कांदा निर्यात सुरू झाल्याने पाकिस्तानने स्पर्धेत टिकण्यासाठी निर्यात शुल्क निम्म्यावर केले आहे.

अडकलेल्या कंटेनरचा प्रवास सुरू

चाळीस टक्के निर्यात शुल्क भरून कांदा निर्यात खुली करण्याच्या केंद्र सरकारच्या आदेशानंतर काही तांत्रिक अडचणींमुळे तीन दिवसांपासून मुंबई येथील जेएनपीटी बंदरात हजारो टन कांदा अडकून पडला होता. सुमारे २५० कंटेनरमधील सात हजार टन कांदा अखेर मंगळवारी संध्याकाळपासून परदेशात रवाना होण्यास सुरुवात झाल्याची माहिती सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. बुधवारी शंभर तर गुरुवारी देखील शंभर कंटेनर श्रीलंका, दुबई, मलेशिया, कुवेत, कतारकडे रवाना झाल्याची माहिती कांदा निर्यातदार भारत शिंदे, विकास सिंग यांनी दिली. केंद्र सरकारचा अध्यादेश। ७ नेच्या संध्याकाळपर्यंत सीमा शुल्क विभागाच्या वेबसाइटवर अपडेटच आला नसल्याने हे कंटेनर अडकून पडले होते.

भारताचे निर्यात शुल्क मात्र ५५० डॉलर

पाकिस्तानने ३५० डॉलर प्रति टन निर्यात शुल्क केले असले तरी भारताचे निर्यातशुल्क मात्र ५५० डॉलर आहे. त्यामुळे पाकिस्तानचा माल कमी भावात जाईल. स्पर्धेत टिकण्यासाठी भारतानेदेखील निर्यातशुल्क कमी करावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत. भारत सरकारने निर्यात शुल्क ५५० डॉलर केले तसेच ४० टक्के निर्यात शुल्कहीं भरावे लागेल. शिवाय कांटा उत्पादकांना अॅडव्हान्स पेमेंट करायचे आहे. त्यामुळे आंतराष्ट्रीय बाजारपेठेत टिकण्यासाठी भारतालाही निर्यातशुल्क कमी करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, पाकिस्तान आपल्यापेक्षा थेट अर्ध्या किमतीत इतर देशांना माल पाठवत आहे.

Onion Rates : निर्यात सुरू पण कांद्याचे दर जैसे थे! शेतकऱ्यांना किती मिळतोय दर?

टॅग्स :कांदामार्केट यार्डपाकिस्तानशेती