Join us

नंदुरबार बाजार समितीतून उत्तर भारतात कांदा निर्यात, इथे काय बाजारभाव मिळतोय?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2024 1:13 PM

नंदुरबार कृषी बाजार समितीने सुरू केलेल्या कांदा मार्केटमध्ये सध्या उन्हाळी कांद्याची मुबलक आवक सुरू आहे.

नंदुरबार : कृषी बाजार समितीने सुरू केलेल्या कांदा मार्केटमध्ये सध्या उन्हाळी कांद्याची मुबलक आवक सुरू आहे. या कांद्याला चांगले दर मिळत असल्याने शेतकरी सुखावले आहेत. दरांमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढला असून जानेवारी ते मार्च या कालावधीत कांदा मार्केटने पावणे दोन कोटीच्या उलाढालीचा टप्पा पार केला आहे.

नंदुरबार बाजार समितीत कांदा मार्केट सुरू करण्यात यावे यासाठी शेतकरी सातत्याने मागणी करत होते. या मागणीनुसार २६ जानेवारीपासून प्रत्यक्ष कांदा मार्केट सुरू करण्यात आले होते. या मार्केटला पहिल्या दिवसापासून प्रतिसाद चांगला असल्याने व्यापाऱ्यांमध्येही उत्साह आहे. दरम्यान सध्या नंदुरबार जिल्ह्यातील विविध भागांत लागवड केलेला रब्बी कांदा काढणी सुरू आहे. काढणी केलेला कांदा थेट बाजारात येत आहे. यामुळे दर दिवशी १ हजार क्विंटलपेक्षा अधिकची कांदा खरेदी होत आहे. कांदा खरेदी करण्यासाठी बाजार समितीने पाच व्यापारी नियुक्त केले आहेत. या व्यापाऱ्यांकडून इंदौर आणि दिल्ली बाजारपेठेच्या दरानुसार कांद्याला दर देण्यात असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

उलाढाल वाढली

नंदुरचार बाजार समितीने सुरू केलेल्या कांदा मार्केटमध्ये आतापर्यंत १३ हजार ७८७ क्विंटल कांदा खरेदी झाली आहे. यातून १ कोटी ६२ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. २६ जानेवारी ते ३१ मार्च यादरम्यानची ही उलाढाल आहे. मंगळवारी कांदा बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या रांगड़ा उन्हाळी कांद्याला प्रति क्चिटल १ हजार २०० ते १ हजार ३५३ रुपये प्रति क्विंटल दर देण्यात येत होता. सध्या नंदुरबार तालुक्यात रांगडा कांद्याची काढणी सुरू आहे. यामुळे आगामी एप्रिल महिन्यापर्यंत कांदा मार्केटमध्ये तेजी कायम राहण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

परराज्यात निर्यात

सोमवारी बाजारात १ हजार ७१ क्विंटल कांदा आवक झाली होती. व्यापारी वर्गाने खरेदी केलेला हा कांदा थेट गुजरात, मध्य प्रदेश, दिल्ली आणि हरयाणात खाना करण्यात आला. उत्तर भारतात महाराष्ट्रातील रांगडा अर्थात आकाराने मोठ्या असलेल्या कांद्याला मागणी आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात खरेदी केलेला कांद्यालाही गुजरात आणि दिल्लीच्या बाजारात रवाना करण्यात आले होते. दर दिवशी नंदुरबार बाजारात कांदा आवक वाडत असल्याने बाजारातील तेजी वाढत आहे. 

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा... 

टॅग्स :शेतीमार्केट यार्डकांदानंदुरबार