Join us

नंदुरबारच्या मिरचीचे दर घसरले, आखाती देश आणि बांगलादेशातून मागणी घटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 14:35 IST

Nandurbar Mirchi : या मिरचीला १२ ते १५ रुपयांपर्यंतच भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.

नंदुरबार :मिरची आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या नंदुरबार बाजारात गेल्या चार दिवसात दर दिवशी १० हजार कट्टे हिरवी मिरची बाजारात येत असून मागणी कमी असल्याने या मिरचीला मातीमोल भाव मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान होत आहे. प्रामुख्याने आखाती देश आणि बांगलादेशातून मागणी नसल्याने नंदुरबारच्या मिरचीचा ठसका हंगामाच्या तोंडावरच कमी झाला आहे.

गेल्या वर्षात कापूस पिकापेक्षा मिरची उत्पादनाने शेतकऱ्यांना स्थैर्य दिल्याने यंदा नंदुरबार जिल्ह्यात साडेआठ हजारापेक्षा अधिक हेक्टरवर मिरचीची लागवड करण्यात आली आहे. यात गौरी या वाणाला शेतकऱ्यांना पसंती दिल्याने सर्वत्र हिरवीगार मिरचीचे उत्पादन सुरु झाले आहे. प्रारंभीच्या काळात झाडावर येणारी ही मिरची तोडून लाल मिरचीची प्रतीक्षा करण्यात येते.

यंदा प्रारंभीच्या काळातच झाडांवर लगडणाऱ्या मिरच्यांची संख्या सरासरीपेक्षा अधिक असल्याने बाजारात हिरव्या मिरचीची प्रचंड आवक होत आहे. अनंत चर्तुदर्शीनंतर नंदुरबार बाजारात पहिल्या दिवशी १० हजार कट्टे मिरची आली होती. या मिरचीला १२ ते १५ रुपयांपर्यंतच भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.

लाल मिरचीच्या हंगामाकडे शेतकरी बांधवांचे लक्षनंदुरबारात हिरवी मिरची प्रारंभीच्या काळात ढेपाळल्याने लाल मिरचीच्या हंगामाबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे यंदा पंजाबमधील केचअप तयार करणाऱ्या उद्योजकांनीही नंदुरबारकडे पाठ केल्याने हिरवी मिरचीचे दर कोसळत आहेत. येत्या काळात यात सुधारणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

तिकडचे व्यापारी म्हणतात, इकडे मागणीच नाही...नंदुरबार येथील हिरवी मिरची प्रामुख्याने आखाती देश आणि बांगलादेशात निर्यात केली जाते. तेथून सप्टेंबर प्रारंभीपासून मागणी नसल्याने यंदा नंदुरबार येथे मिरची खरेदी करून निर्यात करणारे व्यापारी मालाच्या खरेदीसाठी सरसावलेले नाहीत. बहुतांश हिरवी मिरची योग्य पद्धतीने न ठेवल्यास खराब होण्याची शक्यता अधिक असते. यामुळे व्यापारीही मिरची खरेदीबाबत साशंक आहेत. यातून बाजारात दरदिवशी १० हजार क्विंटल माल येत असला तरी त्याची खरेदी मात्र टळत आहे. शेतकरी व्यापारी व आडतदारांसोबत असलेल्या संबंधातून माल ठेवून घरी जात आहेत.

बांगलादेशात नियमित जाणाऱ्या मिरचीला खराब हवामानाचे कारण देत व्यापारी वर्गाकडून मागणी कमी आहे. आखाती देशात मिरची न पाठविण्याचे कोणतेही ठोस कारण नसले तरी नंदुरबारच्या व्यापाऱ्यांना मुंबई येथील व्यापारी मागणी नसल्याचे उत्तर देत बोळवण करत आहेत. येत्या काळात बांग्लादेशातून मागणी वाढल्यास लाभ मिळण्याची शक्यता आहे. परंतू त्याआधी उत्तर प्रदेशातील ढोबळी हिरवी मिरची बांगलादेशातील बाजारात पोहोचल्यास नंदुरबारच्या शेतकऱ्यांची संकटे वाढण्याची शक्यता मिरची खरेदीदार व्यापारी वर्गाकडून वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :मिरचीमार्केट यार्डशेती क्षेत्रशेती