-अजय पाटील
जळगाव : यंदा कापसाचा हंगाम (Cotton Season) संपत आला असून, यंदा हंगामाच्या सुरुवातीपासून ते हंगाम संपेपर्यंत कापूस उत्पादक (cotton farmer) शेतकऱ्यांना चांगला भाव मिळालाच नाही. भारताच्या कापसाला आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी घटली, त्यामुळे यंदा भारताच्या मालाची निर्यात बऱ्यापैकी कमी झाली आहे. गेल्या पाच वर्षात यंदा सर्वात कमी म्हणजे 8 लाख गाठींची निर्यात (Kapus Niryat) भारतातूनच झाली आहे.
त्यातच भारतातील अंतर्गत मागणीही यंदा कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळाला नसल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 5 लाख 50 हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड ही जळगाव जिल्ह्यात होते. मात्र, यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. तसेच मालाची गुणवत्ता देखील कमी झाली आहे.
मागणी घटण्याचे कारणं...
- जगात चीन, बांग्लादेश व व्हिएतनाम हे तीन देश कापसाचे मुख्य आयातदार देश आहेत.
- यंदा मात्र या तिन्ही देशांमध्ये फारशी मागणी दिसून आलेली नाही.
- निर्यातीमध्ये भारताच्या कापसाचे दर सध्या 52 हजार 800 रुपये खंडी एवढे आहेत. तर इतर निर्यातदार देश असलेल्या ब्राझील, अमेरिकेचे दर
- भारतापेक्षा कमी आहेत.
- भारताच्या स्पर्धेतील निर्यातदार देशांचे निर्यातीचे दर कमी असून, मालाची गुणवत्ता देखील यंदा चांगली आहे. त्यामुळे भारताच्या मालाला यंदा
- मागणी दिसून आली नसल्याचे कॉटन व्यापारातील जाणकार सांगत आहेत.
गेल्या पाच वर्षात कापसाची लागवड आणि निर्यात
भारत व महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात कापसाची लागवड क्षेत्र पाहिले असता 2020 रोजी महाराष्ट्रात 42.25 लाख हेक्टर, तर भारतात 127.6 लाख हेक्टर, 2021 मध्ये महाराष्ट्रात 39.40 लाख हेक्टर तर भारतात 129 लाख हेक्टर, 2022 रोजी महाराष्ट्रात 42.22 लाख हेक्टर तर भारतात 119.60 लाख हेक्टर, 2023 मध्ये महाराष्ट्रात 42.22 लाख हेक्टर तर भारतात 124 लाख हेक्टर आणि 2024 मध्ये महाराष्ट्रात 40.86 लाख हेक्टर तर भारतात 113 लाख हेक्टरवर लागवड झाली होती.
तर गेल्या पाच वर्षात भारताकडून झालेली निर्यात कशी आहे तेही पाहूयात 2020-21 मध्ये 77 लाख गाठी, 2021-22 मध्ये 42 लाख गाठी, 2022-23 मध्ये 15 लाख गाठी, 2023-24 मध्ये 28 लाख गाठी, तर 2024 25 मध्ये आठ लाख गाठींची निर्यात झालेली आहे. यामुळे स्थानिक बाजारात निर्यातदार देशांमध्येही यंदा भारताच्या कापसाला फारशी मागणी नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक लागवड..राज्यात एकूण 40 लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड केली जाते. त्यात सर्वाधिक 5 लाख 40 हजार हेक्टरवर लागवड जळगाव जिल्ह्यात होते. तर 4 लाख 50 हजार हेक्टर क्षेत्रावर यवतमाळ तर गोंदिया, अकोला, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड होते.
भारताच्या मालाची ज्या मुख्य देशात निर्यात होते यंदा त्या देशात मागणी घटली आहे. यामागे यंदा अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टी झाली. यामुळे कापसाच्या उत्पादनातही घट झाली. मालाची क्वॉलिटी काही प्रमाणात ढासळली. त्यातच भारताच्या मालाचे दर इतर निर्यातदार देशांच्या तुलनेने जास्त आहेत. आयातदार देशांनी भारताच्या मालापेक्षा इतर निर्यातदार देशांच्या मालाला मागणी दाखवली.- प्रदीप जैन, संस्थापक अध्यक्ष, खान्देश जिनिंग असोसिएशन