नंदुरबार : शेतकऱ्यांकडील कापूस संपण्यावर आला असतानाच आता भाव वाढू लागला आहे. खासगी व्यापारी जादा भाव देऊ लागले आहेत. सीसीआयचा भाव सात ते साडेसात हजारांपर्यंत मिळत आहे, तर खासगी व्यापारी त्यापेक्षा ५०० ते ७०० रुपये जादा भाव देत आहेत. आंतरराष्ट्रीय निर्यातीत कापसाच्या गाठींच्या किमतीत वाढ झाल्याने कापसाचा किरकोळ भावदेखील वाढला असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, ७० टक्के कापूस उत्पादकांकडील कापूस संपण्याच्या मार्गावर आहे. असे असताना, भाव वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी देखील व्यक्त केली जात आहे. नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत कापूस उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. जवळपास एक लाख २० हजार ते एक लाख ४५ हजार हेक्टरपर्यंत कापूस लागवड केली जात आहे.
कापूस हंगाम आणखी महिनाभर राहण्याची शक्यता...अनेक शेतकरी कापूस विक्री करून मोकळे झाले आहेत. जवळपास ७० टक्के कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे आता कापूस शिल्लक नाही. त्यातच भाव वाढला असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. तर ज्या शेतकऱ्यांकडे साठवून ठेवलेला कापूस आहे, तो आणखी भाव मिळण्याची शक्यता लक्षात घेता तो कापूस शेतकरी बाहेर काढत नसल्याची दिसून येत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजाराचा होऊ लागलाय परिणाम...आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या गाठींचे भाव वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय अस्थिर स्थिती, अमेरिकन टेरीफ, युद्धाचे ढग, डॉलरच्या तुलनेत घसरलेला रुपया यासह इतर कारणांमुळे कापसाचे भाव वाढू लागले आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या आठवड्यापासून कापसाच्या गाठींचे भाव १५ ते २५ टक्क्यांनी वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. येत्या काळात त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता कापसाचे भाव वाढू लागल्याचे सांगण्यात आले.
नंदुरबार जिल्ह्यात चार ठिकाणी सीसीआयचे खरेदी केंद्र सुरू आहे. त्यापैकी शहादा केंद्रात सर्वाधिक खरेदी झाल्याचे सांगण्यात आले. याशिवाय नंदुरबार केंद्रात देखील चांगली खरेदी होत आहे. दोन्ही मिळून जवळपास तीन ४ लाख क्विंटल कापूस खरेदी झालेला आहे. तळोदा व नवापूर येथील खरेदी केंद्रालाही बऱ्यापैकी प्रतिसाद आहे. २२ जानेवारीपर्यंत नोंदणी झालेली आहे.
दुसरीकडे येत्या काळात कापसाला चांगला भाव मिळण्याची अपेक्षा लक्षात घेता खासगी व्यापारी शेतकऱ्यांकडून क्विंटलला ५०० ते ७०० रुपये जादा भाव देऊन कापूस खरेदी करीत आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक आहे, ते शेतकरी अशा व्यापाऱ्यांना कापूस विक्री करीत असल्याचे दिसून येत आहे. आणखी एक महिना कापूस विक्री होऊ शकते.