Tur Market : नोव्हेंबर २०२४ पासून तुरीच्या किंमती कमी होत आहेत. गतवर्षीच्या दरापेक्षा चालू वर्षी तुरीचे भाव (Tur Bajarbhav) कमी आहेत. सध्या सुरू असलेल्या जुलै महिन्यात तुरीचे भाव कसे राहतील? याबाबत थोडक्यात माहिती घेऊयात...
मागील तीन वर्षातील लातूर बाजारपेठेतील तुरीच्या जुलै मधील सरासरी किंमती पाहिल्या तर जुलै २०२२ मध्ये ६ हजार ८६८ रुपये प्रति क्विंटल, जुलै २०२३ मध्ये ९ हजार ९५४ रुपये, जुलै २०२४ मध्ये १० हजार ४७३ रुपये प्रति क्विंटल अशा होत्या.
सध्याच्या हंगामासाठी सरकारने खरीप २०२४-२५ साठी जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमतीपेक्षा (७५५० रुपये प्रति क्विंटल) सध्याच्या तुरीच्या किंमती कमी आहेत. तर जुलै २०२५ मध्ये म्हणजे या महिन्यात तुरीला क्विंटलमागे ६ हजार ३०० ते ६ हजार ८५० रुपये प्रति क्विंटल दर मिळण्याची शक्यता आहे. सदर संभाव्य अंदाज हा FAQ ग्रेड च्या तुरीसाठी आहे
तूरीचा आयात कोटा मर्यादितमाहे डिसेंबर ते एप्रिल हा तुरीचा प्रमुख विक्री हंगाम असतो. चालू वर्ष जून (२२ जून २०२५) मधील तुरीची आवक मागील वर्षाच्या तुलनेत वाढलेली दिसून येत आहे. जून २०२५ मध्ये ६.१ लाख टन आहे, जी मागील वर्षी याच कालावधीत ४.७ लाख टन होती.
तूरीच्या बाजारपेठेवर मागील वर्षातील तूर साठा, आयात तसेच चालू वर्षातील उत्पादन यांचा परिणाम होताना दिसतो. केंद्र शासनाने तूर निर्यातीसाठी खुली केली असून तूरीचा आयात कोटा मर्यादित ठेवलेला आहे.
उत्पादन किती होईल? तूर हे खरीप पिक असून त्याची पेरणी जून ते जुलै व काढणी डिसेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान केली जाते. भारत सरकारने जाहीर केलेल्या नवीन उत्पादन अंदाजानुसार सन २०२४-२५ मध्ये तुरीचे उत्पादन सुमारे ३५.६१ लाख टन होण्याची शक्यता आहे.
जे मागील वर्षीच्या तुलनेत जास्त असल्याचे दिसून येत आहे. तसेच महाराष्ट्रातील २०२३-२४ मधील उत्पादन १०.१० लाख टनांवरून सन २०२४-२५ मध्ये १३.६ लाख टनांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.